शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी आदिती निश्चितच दैदिप्यमान कामगिरी करेल – महापौर
![Administration will definitely perform the city's denotial - Mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Webp.net-compress-image-2-1-scaled-e1629962540937.jpg)
पिंपरी चिंचवड | शाहूनगर येथील आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर पदी झालेली निवड शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. पिंपरी -चिंचवड शहराचा नावलौकीक वाढविण्यासाठी आदिती निश्चितच दैदिप्यमान अशी कामगिरी करेल, असा विश्वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला.शहरातून भारतीय वायूसेनेत फ्लाईंग ऑफिसर पदी एकमेव निवड झालेल्या आदिती कटारे यांनी महापौर ढोरे यांची महापौर कक्षात भेट घेतली. त्यावेळी आदिती कटारे यांचा सत्कार करताना त्या बोलत होत्या. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्य तुषार हिंगे, स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, अदिती कटारे यांचे वडील कल्याण कटारे, आई मंजुषा कटारे उपस्थित होत्या.
कल्याण कटारे हे गेले 25 वर्ष शाहूनगर येथे वास्तव्यास असून त्यांची कन्या आदिती कटारे यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण संभाजीनगर येथील कमलनयन बजाज शाळेतून पूर्ण केले आहे. तसेच आदिती कटारे यांनी बिबवेवाडी येथील व्ही. आय. टी. संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स या विषयाची बी.टेक ही पदवी संपादन केली आहे. त्यांची नुकतीच भारतीय वायुसेनेत फ्लाईंग ऑफिसर पदी निवड झाली असून त्यांना पुढील 6 माहिन्यांचे प्रशिक्षण हैदराबाद येथे देण्यात येणार आहे. त्यानंतर बेंगलोर येथे 1 वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय वायुसेनेत पुढील नेमणूक मिळणार असल्याची माहिती त्यांचे वडील कल्याण कटारे यांनी दिली.