नगरसेवक घोळवेंवरील कारवाई ‘हा’भाजपाला बदनाम करण्याचा डाव : अमोल थोरात
![नगरसेवक घोळवेंवरील कारवाई ‘हा’भाजपाला बदनाम करण्याचा डाव : अमोल थोरात](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-02-at-6.19.15-PM-1.jpeg)
- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनावर दबाव?
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘हा’भाजपाला बदनाम करण्याचा डाव आहे, अशी टीका भाजपा संघटन सरचिटणीस व प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.
अमोल थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या नावाने काही लोक पैसे गोळा करत असल्याची तक्रार होती. त्यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजता भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह गुड्डू यादव यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली.
वास्तविक, ज्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे तो व्यक्ती गेल्या १५ वर्षांपासून सुमारे १०० व्यापाऱ्याकडून पैसे गोळा करण्याचे काम करीत आहे. राजकीय दबाव निर्माण करुन चुकीच्या पद्धतीने भाजपाच्या नगरसेवकाला अडकवण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवडमधील राजकीय व्यक्ती करीत आहेत, असा दावाही अमोल थोरात यांनी केला आहे.
दरम्यान, सुमारे ५० व्यापाऱ्यांना सोबत घेवून फिर्यादीविरोधात पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांना निवेदन दिले आहे. आगामी तीन दिवसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही अमोल थोरात यांनी दिला आहे.
- पोलीस उपायुक्तांच्या भेटीला भाजपा पदाधिकारी…
पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्याबाहेर माजी उपमहापौर तथा नगरसेवक केशव घोळवे यांच्यावरील कारवाईबाबत भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. यावेळी सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले की, गेल्या १० वर्षांपासून घोळवे भाजपाच्या माध्यमातून कार्यरत आहे. कामगार नेते म्हणून घोळवे यांनी वंचित, शोषित घटकांना न्याय देण्याचे काम घोळवे करीत आहेत. मेट्रो स्टेशनचे काम सुरू होणार होते. त्यावेळी संबंधित सर्व १०० व्यापारी ‘‘आमच्या रोजीरोटीवर गदा येणार आहे. आम्हाला पर्यायी जागा द्या.. ’’अशी मागणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळीपासून घोळवे यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. व्यापाऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्या घोळवे यांना काहीही पुरावा नसताना पोलिसांनी अटक केली आहे. हा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला बदनाम करण्याचा डाव आहे, असेही ढाके यांनी म्हटले आहे.