नशेत वाहन चालवताना नियंत्रण सुटून अपघात
पिंपरी चिंचवड | मादक पदार्थाच्या नशेत मैत्रिणीला केटीएम दुचाकीवरून घेऊन जाताना दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. रस्त्यामधील दुभाजकाला दुचाकी धडकून अपघात झाला. यात दुचाकीस्वार स्वतः आणि त्याची मैत्रीण दोघेही जखमी झाले.अजिंक्य रामदास संकपाळ (वय ४२, रा. शेखवस्ती, वाकड) असे दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी जखमी महिलेचे वडील रमेश धनपाल भोकरे (वय ५९, रा. गारगोटी, ता. भुदरगड, कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजिंक्य त्याच्या केटीएम ड्यूक दुचाकीवरून फिर्यादी यांच्या मुलीला घेऊन जात होता. फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपी अजिंक्य मादक पदार्थाच्या नशेत असताना त्याने भरधाव वेगात दुचाकी चालवली. त्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि हिंजवडी-वाकड रोडवर रस्त्यावरील दुभाजकाला दुचाकी घासत गेली. यात फिर्यादी यांच्या मुलीच्या डोक्याला, पोटाला, हातापायाला मार लागून गंभीर जखमी झाली. तसेच आरोपी अजिंक्य देखील जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.