जुनी सांगवी येथे पादचारी व्यक्तीचा मोबाईल हिसकावला
पिंपरी l प्रतिनिधी
मोबाईल फोनवर मेसेज टाईप करत रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता दत्त आश्रमासमोर जुनी सांगवी येथे घडली. याबाबत 19 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशसिंह चतुरसिंह राजपूत (वय 48, रा. गोखलेनगर, पुणे) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 6 फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथील दत्त आश्रमासमोरील सार्वजनिक रस्त्याने पायी चालत जात होते. रस्त्याने जात असताना ते त्यांच्या मोबाईल फोनवर मेसेज टाईप करत होते. त्यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.