पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ विवाहितेने घेतले पेटवून
![Shocking! Trying to break into the house and burn two sisters alive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/women-fire-1.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. त्यांना वंशाचा दिवा हवा आहे, या कारणावरून मनस्ताप झाल्याने रागाच्या भरात विवाहितेने स्वतःला पेटवून घेतले. यात भाजल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशेजारी प्रेमलोक पार्क अभिषेक या सोसायटीत १० मार्चला रात्री पावणेबारा वाजता ही घटना घडली.
आनंद छगनराव खैरनार, छगनराव सुखलाल खैरनार, कमलाबाई छगनराव खैरनार, अलका कैलाश ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहित महिलेने सोमवारी (दि. १५) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सतत मुली झाल्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून त्यांना घालून पाडून बोलून छळ केला. त्यांना वंशाचा दिवा हवा आहे या कारणावरून फिर्यादी यांना मनस्ताप झाला. त्या रागाच्या भरात फिर्यादीने रॉकेल अंगावर ओतून माचिसच्या काडीने पेटवून घेतले. यामध्ये ५० ते ५५ टक्के भाजल्याने फिर्यादी यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलिसांनी जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विकास मडके तपास करीत आहेत