कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौरांच्या मुलासह ७० जणांविरोधात गुन्हा दाखल
![A case has been registered against 70 people, including the deputy mayor's son, for violating Corona rules](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/IMG-20210323-.jpg)
पिंपरी – उपमहापौरपदी निवड झाल्यानंतरचा आंनदोत्सव साजरा करणे उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव असताना महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी जमवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपमहापौर हिराबाई घुले यांच्या मुलासह ६० ते ७० जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वाचा :-चिखली येथे 25 एकर मध्ये होणार अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विस्तार
चेतन गोवर्धन घुले (रा. गणेशनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल केलेल्या उपमहापौरांच्या मुलाचे नाव आहे. घुले शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. त्यांच्यासह त्यांच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेतील सुरक्षा परीवेक्षक दत्तात्रय बारकु भोर (वय ६०, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.२३ मार्च रोजी हिराबाई घुले यांची शहराच्या उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौरांचे चिरंजीव चेतन घुले हे त्यांच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र आले. गर्दी करून घोषणाबाजी केली. त्यामुळे सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.