breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारणार कॅन्सर रुग्णालय!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, महापालिका घेणार पुढाकार

चिंचवडमध्ये सर्वपक्षीय शोकसभा, आमदार जगताप यांच्या आठवणींना उजाळा

पिंपरी । प्रतिनिधी

संघर्षातून तयार झालेले नेतृत्व कधीच हार मानत नाही. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे योगदान पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोठे आहे. सामान्य माणसाशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. भूमिपुत्रांच्या समस्या प्रकर्षाने त्यांनी मांडल्या. संघर्षातून निर्माण झालेले स्वयंभू व्यक्तीमत्व निघून गेले. समाजात चांगले काम करतात त्यांचे कार्य भावी पिढ्यांना व्हावे. याकरिता आमदार जगताप यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कॅन्सर रुगणालय उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सामूदायिक शोकसभा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरी महाजन, खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी, काँग्रेस, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आरपीआय, आम आदमी पार्टी, रासप, कामगार संघटना, पत्रकार संघटना, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकरी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगद्गुरू संत तुकाराम यांच्या मंदिरासाठी राज्य शासन मदत करणार आहोत. कारण, जगताप यांचे स्वप्न होते की, या मंदिरासाठी मदत केली पाहिजे. त्यासाठी जगताप कुटुंबियांनीही या मंदिराच्या उभारणीकरीता मोठी मदत केली आहे. तसेच, माजी आमदार विलास लांडे यांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या विधी महाविद्यालयालाही दिवंगत जगताप यांचे नाव देण्यात येणार आहे. ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे.

समाजासाठी संघर्षमय वाटचाल करीत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे कार्य पुढच्या पिढीला कळावे. याकरिता प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिवंगत जगताप यांच्याबाबत मान्यवरांचे अनुभव आणि आठवणी याबाबत पुस्तकस्वरुपात निर्मिती करण्याबाबत पुढाकार घेण्यात येणार आहे, असेही फडणवीस यांनी बोलताना सांगितले.
*
…अन्‌ फडणवीस गहिवरले

शोकसभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागल्या पाहिजेत, यासाठी ते कायम आग्रही होते. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत प्रकृती ठिक नसतानाही आमदार जगताप यांनी मुंबईत मतदान केले. त्यावेळी आम्ही शंकर जगताप आणि कुटुंबियांना सांगितले होते की, प्रकृती ठिक नाही. त्यामुळे त्यांना प्रवास करायला नको. पण, आमदार जगताप ऐकले नाहीत. पक्षासाठी मला काहीही झाले तरी मतदान करायचे आहे, अशी ठाम भूमिका घेतली. असा सच्चा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही. अतिदक्षता विभागात त्यांना पहायला गेले असता आपल्या बंधुंना बोलावून यांना चहा-पाणी करा, अशी सूचना देतात…ही आठवण सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गलबलून आले. त्यामुळे सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button