बोऱ्हाडेवाडी शाळेतील ९ वी, १० वीच्या वर्गांची ‘घंटा वाजली’
- नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांच्या पाठपुराव्याला यश
- भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे सहकार्य
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका बोऱ्हाडेवाडी येथील कै. महादू श्रीपती सस्ते मुला- मुलींच्या शाळेत पहिली ते आठवीसोबत आता नववी आणि दहावीचे वर्गही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाग शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांना धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांच्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या दालनात मंगळवारी बोऱ्हाडेवाडी येथील शाळेतील ९ वी १० वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, माध्यमिक शिक्षण विभागाचे पराग मुंडे, कार्यालयीन अधीक्षक सुजाता गोळे, बोऱ्हाडेवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक वनिता भांगे, भारती रिटे यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल, भोसरी येथील माध्यममिक विभागाचे मुख्याध्यापक झरीन शेख आदी उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून नगरसेविका सारिका बोऱ्हाडे शाळेबाबत पाठपुरावा करीत होत्या. कोरोना परिस्थितीमुळे ९ वी व १० चे वर्ग सुरू करण्यात अडथळा निर्माण झाला होता. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी फोनद्वारे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांच्यासोबत चर्चा केली आणि विषय मार्गी लावण्याबाबत आग्रह धरला. अखेर ९४ विद्यार्थ्यांच्या १० वीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
नगरसेविका सारिका बोऱ्हाडे म्हणाल्या की, बोऱ्हाडेवाडीतील शाळेत वाडी व वस्त्यांवरील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याठिकाणी पहिले ते आठवीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खासगी शिक्षण संस्थांकडे प्रवेश घ्यावा लागतो. आर्थिकदृष्ट्या खासगी शिक्षण घेण्याकडे संबंधित पालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे महापालिकेच्या कै. महादू श्रीपती सस्ते शाळेत दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा असावी, अशी आमची मागणी आहे.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले की, शाळेत ९ वी व १० वीच्या वर्गासाठी महापालिका शिक्षण समितीकडून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण विभागाची मान्यता मिळण्यास कोरोना परिस्थितीमुळे उशीर होत आहे. त्यामुळे या ठिकाणी भाग शाळा सुरू करण्यात येईल. तसेच, ८ वीतून ९ वीमध्ये प्रवेश करणाऱ्या ९४ विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी समाविष्ट करुन घेण्यात आले आहे, असेही अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.
आमदार लांडगेंच्या सूचनेला अतिरिक्त आयुक्तांची दाद…
बोऱ्हाडेवाडी येथील शाळेत ९ वी व १० वीचे वर्ग सुरू करण्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून नगरसेविका सारिका बोऱ्हाडे प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोविड परिस्थिती आणि प्रशासनाच्या अडचणींमुळे हा विषय प्रलंबित राहीला आहे. आता शाळा सुरू होणार आहे. शाळेत शिक्षण घेणऱ्या ८ वीतील ९४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा सोडवणे अपेक्षीत आहे. त्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी सहकार्य करावे, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बैठक सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना भ्रमणध्वनीवर केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ढाकणे यांनी भाग शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे संबधित विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वीसाठी आहे त्याच शाळेच प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.