चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राचे 85 टक्के काम पूर्ण
![85% work of Chikhali Water Treatment Plant completed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Webp.net-compress-image-4-e1628918522784.jpg)
पिंपरी चिंचवड | आंद्रा भामा आसखेड धरणातून पिंपरी- चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र चिखली येथे बांधण्यात येत असून त्याचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करुन नागरिकांना शुध्द व पुरेसा पाणीपुरवठा होईल. याबाबत अधिका-यांनी नियोजन करावे, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी दिल्या.
चिखली येथील प्रकल्पाच्या कामाची पाहणी पदाधिका-यांनी केली. उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे यांच्यासह सहशहर अभियंता प्रविण लडकत, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
लोकसंख्या वाढीचा दर आणि शहराच्या विकासाच्या वाढीचा वेग लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आंद्रा व भामा आसखेड धरणातून 97.661 दशलक्ष घन मीटर पाणी कोटाची शासनाकडून मान्यता घेतली आहे. त्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रे उभारण्याचे काम 13 सप्टेंबर 2019 रोजी सुरू झाले आहे. यामधील एअरेशन फाउंटेन, क्लॅरीफ्लोक्युलेटर, फिल्टर हाऊस, शुध्द पाण्याची संपवेल इत्यादी मुख्य कामे पुर्णत्वाच्या मार्गावर असून ती कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना महापौर ढोरे यांनी यावेळी दिल्या.
डिसेंबर 2021 अखेर या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शहरातील नागरिकांना पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशाही सूचना देण्यात आल्या.