कोरोनात कडक निर्बंध अमंलबजावणीसाठी नव्याने 16 भरारी पथक नियुक्त
पिंपरी |महाईन्यूज|
राज्य शासनाच्या आदेशानुसार लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा पिंपरी-चिंचवड शहरात पुरता बोजवारा उडाला असल्याने महापालिकेने नव्याने १६ भरारी पथके तयार केली आहेत. सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत दोन सत्रात ही पथके तपासणीचे काम करणार आहेत. करोना नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.
राज्य शासनाने सुरुवातीला कडक निर्बंध व त्यानंतर टाळेबंदी लागू केली. त्यानुसार, लागू करण्यात आलेल्या शासननियमांचे शहरात पालन होत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. करोना संसर्ग आणखी वाढू नये, यादृष्टीने पालिका आयुक्तांनी नव्याने १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. पालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांचाही या पथकांमध्ये समावेश आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी तीन ते रात्री ११ अशा दोन सत्रात ही पथके काम करणार आहेत. मुखपट्टी न घातल्यास ५०० रुपये, रस्त्यावर थुंकल्यास एक हजार रुपये, दुकाने खुली असल्यास अडीच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तीन वेळा दंड आकारणी झालेली दुकाने सील करण्यात येतील, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.