हॉकी पॉलिग्रासचा दर्जा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार हवा; उपमहापौर तुषार हिंगे यांची भूमिका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1-16.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर धान्यचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडिमयमध्ये नवीन पॉलिग्रास बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे पॉलिग्रास आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियम वअटीनुसार बसविले जावे, अशी आग्रही भूमिका उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी घेतली आहे.
नियमानुसार काम झाल्यास या मैदानावर भविष्यात आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उपमहापौर हिंगे यांनी या मैदानाची बुधवारी (दि.11) पाहणी केली. या वेळी क्रीडा समितीचे सहायक आयुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, या कामाचे सल्लागार, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे व अधिकारी उपस्थित होते. पाहणीनंतर त्यांनी संबंधित अधिकार्यांना वरील सूचना केल्या.
मैदानातील जुने पॉलिग्रास खराब झाले असून, त्या ऐवजी नवे पॉलिग्रास टाकण्याचे काम नुकतेच स्थापत्य विभागामार्फत सुरू झाले आहे. या कामांचा खर्च सुमारे 4 कोटी 14 लाख 95 हजार इतका आहे. हे काम स्पोर्टीना एक्झाम प्रा. लि. या कंपनीमार्फत सुरू आहे. या कामांची पाहणी उपमहापौर हिंगे यांनी केली.
तुषार हिंगे म्हणाले की, म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात हॉकी पॉलिग्रास बदलण्याचे काम सुरू आहे. तेथील काम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार होत आहे. त्याचा दर्जा उत्तम व व योग्य आहे. त्यानुसार नेहरूनगर मैदानावरही काम केले जावे. किमान दहा वर्षांनंतर पॉलिग्रास बदलले जाते. त्यामुळे या मैदानावर आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी त्या दर्जाचे पॉलिग्रास असायला हवे. त्यात कोणताही तडजोड नको, असा सक्त सूचना त्यांनी अधिकार्यांना केल्या.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या नियमानुसार नवीन पॉलिग्रास टाकले जावे. त्यानुसार काम केले जावे. अन्यथा काम करू दिले जाणार नाही, असा इशारा हिंगे यांनी दिला आहे. स्थापत्य विभागाने कोणतेही काम करताना क्रीडा विभागाशी चर्चा करावी. त्यांना विश्वासात घेऊनच काम करावे. त्यामुळे नागरिकांचा पैशा वाया जाणार नाही, असे ते म्हणाले. या कामासंदर्भात लवकरच ते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.
…तर क्रीडा विभागाच बंद करा – तुषार हिंगे
पॉलिग्रास लावण्याचे हे काम करताना क्रीडा विभागाशी स्थापत्य विभागाने कोणताही समन्वय ठेवला नाही. क्रीडा विभागास विश्वासात न घेता परस्पर हे काम सुरू केले आहे. त्यामुळे क्रीडा विभागाच बंद करून टाका, अशी खंत तुषार हिंगे यांनी व्यक्त केली. क्रीडा विभागासाठी स्वतंत्र स्थापत्य विभाग स्थापन करण्याची हिंगे यांची पूर्वीपासूनची मागणी आहे. त्यामुळे क्रीडा नियमानुसार चांगले काम करता येईल आणि खेळाडूंना शहरात चांगला सुविधा उपलब्ध होतील आणि पालिकेचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे त्याचे मत आहे.