स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवात रसिकांनी अनुभवला मराठी गझलांचा आविष्कार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/L-R-Dattaprasad-Ranade-Vaibhav-Joshi-Ashish-Mujumdar-performing-Sobaticha-Karar-during-Swarsagar-Cultural-Festival-today-1.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘धीरे धीरे पचतायेंगे, येसी भी क्या जल्दी है…’, ‘ मी एवढेच केले …’, ‘ही तुझी आठवण टाळली पाहिजे…’, या आणि यांसारख्या अनेकविध मराठी व हिंदी गझल आणि रसिकांचा त्याला मिळणारा वाह वाह आणि क्या बात है… चा प्रतिसाद असा माहौल आज पिंपरी चिंचवडकरांनी अनुभविला… निमित्त होते पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे.
निगडी प्राधिकरण सेक्टर क्रमांक २७ अ येथील सिटीप्राईड शाळेलगत भेळ चौकाजवळ असलेल्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
पुणे शहरालगतच असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील रसिक प्रेक्षक देखील सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध व्हावे, त्यांनाही शास्त्रीय संगीताबरोबर सांस्कृतिक मैफल अनुभवता याव्यात या उद्देशाने पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टच्या माध्यमातून स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या आजच्या दुस-या दिवसाची सुरुवात वैभव जोशी, दत्तप्रसाद रानडे आणि आशिष मुजुमदार यांचा ‘सोबतीचा करार’ हा मराठी गजलांच्या कार्यक्रमाने झाली.
यावेळी त्यांनी ‘पडद्यावर राष्ट्रगीत दिसते आणि फक्त उभे राहतो आम्ही…’, या कवितेने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘मी एवढेच केले, हसलो मनाप्रमाणेम रडलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे…’, ‘खरा पाहिजे की, बरा पाहिजे…’,‘डोह’, ‘आई’ या मराठी कविता सादर केल्या… ‘ही तुझी आठवण टाळली पाहिजे…’ या त्यांनी सादर केलेल्या मराठी कव्वालीने उपस्थितांची मने जिंकली. त्यांना यावेळी आमोद कुलकर्णी (तबला), निनाद सोलापूरकर (सिंथेसायजर), प्रसाद जोशी (पखावज व ढोलकी), मिलिंद शेवडे (गिटार), प्रशांत कांबळे (ध्वनी) यांनी साथसंगत केली.
यावेळी महोत्सवाचे मुख्य सल्लागार महेश काळे, सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, शरयू फाउंडेशनचे नितीन ढमाले, अभिजित भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते