स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी सरकारकडून अजितदादांवर आरोप
![Nationalist youth's agitation in Pimpri tomorrow against fuel price hike](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/VISHAL-WAKADKAR-1.jpg)
युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला पलटवार
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला भेडसावणा-या अनेक प्रश्नांबाबत सरकारला खुलासा मागितला. खुलासा केल्यास आपले पितळ उघडे पडते, या भितीपोटी स्वत:चा नाकर्तेपणा झाकून नेण्यासाठी सरकारकडून अजित पवार यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टिका पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.
याबाबत वाकडकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे निवडणूकांच्या तोंडावर सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. तर, दुसरीकडे राज्यात सिंचन घोटाळा झालाच नसल्याचा दावा इंजिनिअर्स वेलफेअर असोसिएशनने केला आहे. या असोसिएशनने नागपूर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या चार वर्षात राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मुख्यमंत्री पदासाठी सक्षम चेहरा म्हणून अजितदादांची वाढती लोकप्रियता आहे.
त्यामुळे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने त्यांनी अजितदादांची बदनामी करण्याचे कुटील कारस्तान आखला आहे. परंतू, भाजप सेनेला राज्यातील सुज्ञ जनता ओळखून आहे. गेल्या साडेचार वर्षात सत्ताधा-यांना अजित पवारांच्या विरोधात काहीही हाती न लागल्याने जाणीवपुर्वक सरकारकडून असे प्रकार चालू असल्याचे वाकडकर यांनी म्हटले आहे.