स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील चौकामध्ये सीसीटीव्ही बसवा
![Install CCTV in the city square under Smart City](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/manse-cctv.jpg)
– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम चालू आहे. परंतु मुख्य रस्तावर हे सीसीटीव्ही बसविले जात आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता महत्वाच्या चौकामध्ये सीसीटीव्ही बसवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. या बाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्वरित याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही पक्षाच्या वतीने आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला.
या वेळी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, राजू सावळे, मनसे विद्यार्थी सेनेचे हेमंत डांगे, वाहतूक सेना शहराध्यक्ष सुशांत साळवी, राजू भालेराव, जयवंत चितळकर, दत्ता देवतरासे आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, सध्या शहरामध्ये गुन्हेगारी, तोडफोड, गाड्या चोरीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शहरामधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच सीसीटीव्ही अंतर्गत चौकामध्ये नसल्यामुळे सध्या मोहननगर, रामनगर, विद्यानगर, दत्तनगर, महात्मा फुले नगर, काळभोरनगर या भागामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इथे बहुसंख्य भाग हा गर्दीचा आणि दाटी वाटीचा असल्याने इथे हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या भागांमध्ये आपण मुख्य रस्ते व अंतर्गत चौकामध्ये सुद्धा सीसीटीव्ही बसवावेत. या मुळे या सर्व गोष्टीवर आळा बसविणे सोपे होईल. पोलिसांना सुद्धा गुन्हेगारीवर आणि चोरीवर आळा बसवण्यात मदत होईल, अशी मागणी निवेदनात नमूद केली.