स्मार्ट सिटीच्या स्थापत्य महाव्यवस्थापकपदी अ.मा. भालकर यांची नियुक्ती
- ‘भालकरां’ची आस्थापना महापालिका, अन्ं काम करणार स्मार्ट सिटीचे
- आदेशावरुन प्रशासन सहायक आयुक्तांचा गोंधळ
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या स्थापत्य महाव्यवस्थापकपदी अ.मा. भालकर यांनी वर्णी लागली आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या सांगण्यावरुन ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका शहर अभियंता पदाच्या नियुक्तीवरुन सुरु असलेला वाद मिटण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाकडून पदोन्नतीनूसार शहर अभियंतापदी प्रतिनियुक्तीवर आलेल्या अ. मा. भालकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्णी लागली आहे. त्यांची स्मार्ट सिटीच्या स्थापत्य महाव्यवस्थापकपदी नेमणूक देण्यात आली. मात्र, नियुक्तीवरून वाद सुरू असताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना रुजू करून घेतले. त्यामुळे शासनातील अधिकारी असलेले भालकर आयुक्तांच्या मर्जीतील असल्याने त्यांना महापालिकेत आणल्याची चर्चा सुरू आहे.
महानगरपालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्या पदाचा तात्पुरता पदभार सह शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे दिला होता. परंतू, या पदावर राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अधिकारी अ. मा. भालकर यांची पदोन्नतीने नियुक्ती केली. त्यामुळे या पदावर प्रतिनियुक्तीवरील अधिकारी देण्यास राजकीय विरोध सुरू आहे. तसेच, त्यांच्या नियुक्तीचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून असल्यानेही आक्षेप होता.
दरम्यान, एका महिन्याच्या प्रतिक्षेनंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना रुजू करून घेतले आहे. मात्र, शहर अभिंयतापदाऐवजी भालकर यांना स्मार्ट सिटीचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यांना स्मार्ट सिटीच्या स्थापत्य महाव्यवस्थापकपदी नेमणूक देण्यात आली. मात्र, भालकर यांच्या नियुक्तीनंतर ते आयुक्तांच्या मर्जीतील असल्यामुळे त्यांची नेमणूक झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंर्दभात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निघालेल्या आदेशानुसार नेमणूक देता येते का, अशी विचारणा केली असता त्याचे उत्तर प्रशासनाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांना देता आले नाही. तसेच प्रशासनाने आदेश काढताना भालकरांची आस्थापना महापालिका दाखवून नियुक्ती मात्र, स्मार्ट सिटीवर करण्यात आल्याचे दिसत आहे.