स्थायी सभापती निवडीवरून भाजपात ‘दुफळी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Untitled-1.jpg)
- पक्षाच्या विरोधात बंडखोरीला फुटले तोंड
- राष्ट्रवादी, शिवसेनेने दिला खंबीर पाठिंबा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपतर्फे कोण अर्ज भरणार? याची उत्सुकता लागलेली असतानाच शेवटच्या दहा मिनिटांत विलास मडिगेरी यांचा पक्षातर्फे अर्ज भरण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादीकडून मयूर कलाटे यांनी अर्ज भरला आहे. तर, भाजपच्या नेत्यांनी कुरघोडी केल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करत नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोर करत अर्ज भरला आहे. मयूर कलाटे यांनी जर माघार घेतली तर मडिगेरी आणि शिंदे यांच्यात जोरदार लढत होईल. पक्षश्रेष्ठींच्या या भूमिकेमुळे निष्ठावंत भाजपच्या गटात दुफळी निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे यांना सभापतीपद देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आग्रह धरला होता. पण, मुख्यमंत्र्यांनी शिंदे आणि विलास मडिगेरी या दोघांपैकी एकाला संधी देणार असल्याचे ठामपणे सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
श्रीमंत महापालिकेची तिजोरी समजल्या जाणा-या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या जुन्या गटातील विजय उर्फ शितल शिंदे तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या गटातील संतोष लोंढे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, सभापती पदासाठी भाजपकडून ऐनवेळी विलास मडिगेरी यांचा एकमेव अर्ज भरला आहे. शिंदे यांचे नाव पुढे आले तेव्हा चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संर्थकांत कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. कारण, शितल शिंदे निष्ठावंत भाजपचे समर्थक असल्यामुळे त्यांच्या नावाला भाऊ समर्थकांचा छुपा विरोध आहे. मात्र, भाऊंनी हा विरोध डावलून निष्ठावंतांच्या गटाला न्याय देण्यासाठी शिंदे आणि मडिगेरी यांच्या नावाची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मडिगेरी यांनी पक्षातर्फे अर्ज भरला आहे.
तर, शितल शिंदे यांनी मडिगेरी यांचे नाव पुढे येताच बंडखोर गटाकडून आपला अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचे मयूर कलाटे यांनी अर्ज मागे घेतल्यास मडिगेरी आणि शिंदे यांच्यात निवडणूक होणार आहे. बंडखोर गटाला भोसरीतील दादा समर्थकांचा पाठिंबा मिळाल्यास शितल शिंदे यांचा ‘विजय’ निश्चित मानला जातो.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून लांडगे गटाने ‘शब्द’ घेतला…
सभापती पदासाठी भोसरीचे आमदार लांडगे यांच्या गटातील संतोष लोंढे इच्छुक होते. त्यांनी पाठीमागे महापौर पदासाठी देखील दावा ठोकला होता. त्यांची मनधरणी करून त्यांचे समाधान करण्यासाठी स्थायीचे सभापती पद देण्यात येणार होते. मात्र, राज्य स्तरावरून स्थायीची सुत्रे हालल्यामुळे आमदार लांडगे यांचा नाईलाज झाला आहे. विलास मडिगेरी यांचे नाव पुढे आल्यामुळे लोंढे यांनी पक्षश्रेष्ठींवर कमालीची नारीज व्यक्त केली आहे. हे पद आपल्याला मिळू शकत नसल्याचे संकेत मिळाले तरी देखील लोंढे यांच्या नावासाठी आमदार लांडगे यांचा हट्ट कायम होता. विलास मडिगेरी यांच्या नावाला प्राधान्य दिल्यामुळे लोंढे यांची समजूत काढून भविष्यात त्यांना मोठी संधी देण्याचा ‘शब्द’ आमदार लांडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडून घेतला आहे, असे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात आले आहे.