स्थायीचा कारभार ठेकेदार धार्जिणी; 299 औषधाच्या किंमती अंदाजपत्रकापेक्षा अधिक
- औषधांचा तुटवडा जाणविल्याने समितीकडून खरेदीस ग्रीन सिग्नल
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यात मागील काही दिवसापासून औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे औषधांची कृत्रिम टंचाई जाणवू लागल्याने सत्ताधारी भाजपवर टिकेचा भडीमार सुरु होता. मात्र, 690 एॅलोपॅथी औषधातील 299 औषधांच्या किंमती ह्या अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा जास्त दर प्राप्त झाले होते. त्यावर औषध निवड समितीने मागील एक वर्षापासून खरेदीत प्रक्रिया रेंगाळत ठेवत सध्यस्थितीत प्राप्त दरानूसार खरेदीची शिफारस केली. त्या औषध खरेदीस आज (शुक्रवार) स्थायी समितीने मान्यता दिली.
महानगरपालिकेच्या स्थायी सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी होते. महापालिकेच्या दवाखाने व रुग्णालयास दोन वर्षाचे कालावधीत औषधे व साहित्य खरेदी ई टेंडर काढून उत्पादित कंपनी व वितरकाकडून निविदा मागविण्यात आली. त्यात ई टेंडर एॅलोपॅथी औषधांसाठी निविदा होती.
तज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या औषध निवड समितीने तांत्रिक दृष्ट्या पात्र ठरविलेल्या 21 निविदाधारकांपैकी 19 निविदाधारकांचे 690 बांबीसाठी दर प्राप्त झाले होते. त्यापैकी 391 औषधे अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा कमी आणि 299 औषधे अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा जास्त दर प्राप्त झाले. त्यावर औषध निवड समितीने 690 पैकी 7 बाबी वगळता 683 बाबींच्या प्राप्त दरानूसार औषधे खरेदीची शिफारस केली. त्यानूसार 16 कोटी 49 लाख 60 हजार 746 रुपयांची खरेदी करण्यात येणार आहे.
दरम्यान, सदरील औषधे खरेदी करताना निवड समितीने 299 औषधांचा दर जादा असतानाही ते कमी केलेले नाहीत. तसेच मागील एक वर्षापासून ही औषध खरेदी रेंगाळत ठेवलेली आहे. उलट उत्पादित कंपनी, वितरकांकडून प्राप्त लघुत्तम दरानूसार दोन वर्षासाठी औषधे खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांचे भले होणार आहे. औषधे खरेदीत गोलमाल झालेला असून कंपनी व वितरकांच्या दर अधिक असतानाही ही खरेदी केल्याने महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्यात येवू लागला आहे. या खरेदीची माहिती चुकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादी नगरसेवक पंकज भालेकर व मयुर कलाटे यांनी केला आहे.