सोनसाखळी चोरी, पाकीटमारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची “पीएमपी” बसमध्ये जनजागृती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/4-8.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड हद्दीत वाढत जाणारे सोनसाखळी व पाकीटमारीचे गुन्हे रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक अनोखे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये पोलिसांनी थेट पीएमपीएलच्या बसमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करण्यावर भर दिला आहे.
या उपक्रमाला शुक्रवारी (दि. 20) दुपारी एक वाजल्यापासून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मुख्य बस स्थानकापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस सहायक आयुक्त सतीश पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीास निरीक्षक विठ्ठल कुबडे आदी उपस्थित होते.
यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट बस मधील महिलांशी संवाद साधत चोरटे सोनसाखळी चोरी कशी करतात, अशा वेळी महिलांनी आपल्या दागिन्यांची काळजी कशी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. यावेळी बसमधील पुरुषांनाही मोबाईल, पाकीट यांची कशी काळजी घ्यावयाच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः महिलांना भरगच्च दागिने घालून सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी केवळ सोनसाखळी चोरी नाही, तर वाहन चोरी, किंवा सोशल मिडीयाद्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक याबाबतही जागृत करत, अशा काही घटना घडल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले आहे.