breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘सूर नवा, ध्यास नवा’ च्या छोट्या सूरवीरांनी जिंकली पिंपरी-चिंचवडकरांची मने

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टच्या वतीने ‘स्वरसागर सांस्कृतिक महोत्सवा’ला गुरुवार (दि.28) उत्साहात सुरुवात झाली. निगडी प्राधिकरण येथील  सिटीप्राईड शाळेलगत महोत्सव सुरु केला असून तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप हा सूर नवा, ध्यास नवा’च्या छोट्या सूरवीरांनी सादर केलेल्या कार्यक्रमाने झाला.

‘सूर नवा, ध्यास नवा’ संगीत कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ६ गायकांच्या ‘छोटे सूरवीर’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये उत्कर्ष वानखेडे, अंशिका चोणकर, सृष्टी पगारे, चैतन्य देवढे, स्वराली जाधव व सई जोशी यांनी आपली गायनकला उपस्थितांसमोर सादर केली.

यावेळी उत्कर्ष वानखेडे याने ‘दाता तू गणपती …’ या गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर सई जोशी हिने आनंदी गोपाळ या चित्रपटातील ‘वाटा वाटा… ‘ व ‘अधीर मन झाले रे…’ ही गीते सादर करीत उपस्थितांची वाह वाह मिळविली यानंतर चैतन्य देवढे याने ‘कोणता झेंडा घेऊ हाती…’ हे गीत सादर करीत उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. तर सृष्टी पगारे हिने ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख…’ ही गीते सादर केली. यावर कळस चढविला तो सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाची राजगायिका ठरलेल्या स्वराली जाधव हिने सादर केलेल्या ‘लंबी जुदाई…’ या विरहगीताने.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आंशिका चोणकर हिने ‘बाई मी पतंग उडवीत होते… ‘ ही लावणी सादर केली. तर चैतन्य देवढे याने ‘जाय बा किसना… ‘ ही ‘बोबडी गवळण’ सादर केली. सर्व गायकांनी सादर केलेल्या विविध गाण्याचा समावेश असलेल्या मेडलीने कार्यक्रमाचा समारोप झाला. प्रसिद्ध अभिनेत्री व निवेदिका स्पृहा जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक व महोत्सवाचे मुख्य सल्लागार महेश काळे, महोत्सवाचे मार्गदर्शक व महोत्सवाचे सांस्कृतिक सल्लागार प्रवीण तुपे, पिंपरी चिंचवड सोशल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल गालिंदे, नीतीन ढमाले, अभिजित भालेकर आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button