सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवनात कार्यक्रमांसाठी हॉल उपलब्ध करा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात एकाही सामाजिक उपक्रमासाठी किंवा इतर कार्यक्रमासाठी एकही सांस्कृतिक हॉल उपलब्ध नाही. शहरातील सर्व सांस्कृतिक हॉलचे काम चालू आहेत. पिंपरीमध्ये मेघाजी लोखंडे कामगार भवन हे अल्प दरात हॉल उपल्बध होता. परंतु, त्या ठिकाणीही पालिकेने कार्यालय चालू केले आहे. तरी, सामाजिक उपक्रमांसाठी सभागृह उपलब्ध करून देण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंचने केली आहे.
यासंदर्भात रयतच्या सदस्यांनी महापौर राहूल जाधव यांच्याकडे याबाबत मागणीचे निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन चालू होऊन अनेक दिवस झाले. त्या इमारतीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध आहेत. तरीदेखील पालिका त्या ठिकाणी हॉल उपलब्ध करून देत नाही. खाजगी लोकांना त्या ठिकाणी भाड्याने गाळे मिळतात, परंतु, सामाजिक उपक्रमासाठी पालिकेला हॉल उपलब्ध करून देण्यात काय अडचण आहे?. आचार्य अत्रे, प्रा. रामकृष्ण मोरे हे हॉल खूप मोठे आहेत. प्रत्येकाला त्या ठिकाणी कार्यक्रम घेणे परवडत नाही. पिंपरी हे शहराचे मुख्य केंद्र आहे, म्हणून सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन या ठिकाणी सामाजिक उपक्रमासाठी हॉल लवकरात लवकर पालिकेने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी रयत विचार मंचचे संस्थापक धम्मराज साळवे, प्रभारी अध्यक्ष संतोष शिंदे, कार्यध्यक्ष अंजना गायकवाड, सचिव नीरज भालेराव, महेश गायकवाड, रोहित कांबळे, संदेश पिसाळ उपस्थित होते.