breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामुदायिक शक्तीच्या जोरावर कोरोना संकटातून आपण निश्चितपणे बाहेर पडू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना हा आजार घाबरून जाण्यासारखा नसून आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली, स्वच्छता राखली, फिजिकल डिस्टसिंगचे पालन केल्यास सामुदायिक शक्तीच्या जोरावर या संकटातून आपण निश्चितपणे बाहेर पडू, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजना, व्यवस्थापन आणि नियोजनाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी नामदार अजित पवार महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोविड -१ ९ विरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वॉररूमला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वॉररूममार्फत सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली तसेच महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने केलेल्या विविध उपाययोजना आणि व्यवस्थापनाची माहिती दिली.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसदस्य राजू मिसाळ, वैशाली काळभोर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, अतिरक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदी उपस्थित होते.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या, रुग्णवाहिका, शहरातील उपलब्ध खाटांची संख्या कोरोना टेस्टिंग लेब्सची माहिती, महापालिका तसेच खाजगी रुग्णालयात कोरोना संदर्भात असलेल्या सुविधांची माहिती, शहरातील उद्योगांसाठी येणा-या अडचणी आदी विषयांबाबत नामदार अजितदादा पवार यांनी माहिती घेतली. तसेच पुढील काळातील आवश्यकता लक्षात घेवून आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या. कोरोना तपासणीसाठी आवश्यक वैद्यकीय चाचणी केंद्र महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सुरु करण्यात येणार आहे. यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सहकार्य देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे नामदार अजित पवार यांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगले सहकार्य केल्याबद्दल नागरिकांचे पवार यांनी आभार मानले.

काही नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे अडचणी उदभवत असल्याचे नमूद करून नामदार पवार म्हणाले, कोरोना विरोधात लढण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, अनेक सामाजिक संस्था चांगले काम करत आहे. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये माणसांना आधार देऊन त्यातून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांच्या मी सतत संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत असतो. शहरातील उद्योगधंदे सुरु करण्यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. देश कोरोनामुक्त करण्यासाठी डॉक्टर, पोलीस, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व इतर अनेक लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत असून त्यांना आपण सहकार्य करून बळ दिले पाहिजे अशी विनंती त्यांनी नागरिकांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button