सामाजिक बांधिलकी : वाकड पोलिसांनी केली विसर्जन घाटची स्वच्छता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/visarajan-ghat-saaf-safai.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – नागरिकांना सुरक्षा पुरविणारे पोलीस सण-समारंभ, जयंत्या, उत्सव आदी सार्वजनिक सोहळ्यात दिवस-रात्र खडा पहारा देतात. त्यातच साफसफाई अथवा स्वच्छता करणे पोलिसांचे काम नाही. परंतु, सामाजिक बांधिलकी जपत वाकड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचा-यांनी गणेश विसर्जन झाल्यानंतर आज सोमवारी (दि. 24) वाकड गावठाणातील विसर्जन घाटावर अक्षरशः दाण केलेल्या गणेश मुर्ती सुस्थितीत ठेवून स्वच्छता केली आहे.
पोलिसांनी मूळा नदीवरील वाकड गावठाण विसर्जन घाटावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचा-यांसोबत ही स्वच्छता मोहीम राबविली. महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व घाटांवर कृत्रिम विसर्जन हौद बांधले होते. या हौदांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन केले. सर्वच घाटांवरील कृत्रिम विसर्जन हौद मूर्त्यांनी भरले. त्यातील काही हौदातील मूर्त्या विसर्जनानंतर लगेच काढण्यात आल्या, तर काही मूर्त्या तशाच ठेवण्यात आल्या होत्या. तसेच मूर्तीदान उपक्रमांतर्गत नागरिकांनी मूर्तीदान केलेल्या गणेश मूर्ती देखील विसर्जन घाटांवर मोठ्या प्रमाणात होत्या. या सर्व मूर्त्या वाकड पोलीस आणि महापालिका कर्मचा-यांनी मिळून उचलल्या.
विसर्जनानंतर गणेश मूर्ती उचलणे, त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असते. परंतु, काम झाल्यानंतर तिकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. स्वसंसेवी संस्था सामाजिक कार्याचा डंका पिटवून समाजकार्य करीत असल्याचा आव आणतात. हजारो मुर्त्या दाण घेतल्याचा डिंडोरा पिटतात. प्रत्यक्षात मात्र, या मुर्त्यांची विल्हेवाट व्यवस्थीत लावली जात नसल्यामुळे नियमाचा भंग होतो. पोलिसांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कधी नाजूक तर कधी कठोर भूमिका घ्यावी लागते. हे काम करत असताना पोलीस बांधवांनी आज सोमवारी वाकड येथील नदी घाटावर स्वच्छता देखील केली आहे.