साफसफाई कंत्राटी कामगार महिलांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर धडक मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191202-WA0260.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या एक हजार 500 महिला आहेत. या महिलांना गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही. त्यांना आरोग्यविमा दिला जात नाही. तसेच, त्यांना समान वेतन किमान वेतन हे देखील दिले जात नाही, आणि गेल्या तीन महिन्यापासून त्यांना पगार देखील देण्यात आलेले नाही. या सर्व प्रश्नांवर आज कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने महापालिकावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले.
कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, कार्यध्यक्ष बळीराम काकडे, दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी बीआरएसपीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सर्वजीत बनसोडे, शहराध्यक्ष संजीवन कांबळे, महेंद्र सरोदे, रविकिरण बनसोडे, राम बनसोडे यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला पाठिंबा दिला.
समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे, कायमस्वरूपी कामावर घेतलं पाहिजे, महापालिकेच्या योजनेमध्ये हक्काचे घरकुल मिळालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कष्टकरी महिलांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चा महापालिकेच्या गेटवर आल्यानंतर पोलिसांकडून अढवण्यात आला. याठिकाणी काहींनी भाषणे केली.