सांगवी पोलिसांनी घरफोडीतील सराईतांच्या आवळल्या मुसक्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/IMG-20180829-WA0057-1.jpg)
- पावनेसात लाखाचा मुद्देमाल केला जप्त
- सांगवी पोलिसांची यशस्वी कामगिरी
पिंपरी (महा ई न्यूज) – दुचाकी वाहनांसह घरफोडी करून सोन्याचांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणा-या सराईत दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. दागिन्यांसह दुचाक्या असा एकूण 6 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.
रविकरण माताबदल यादव (वय 22, रा. ओमसाई अपार्टमेंट फ्लॅट, शिक्षक कॉलनी, पिंपळे निलख) आणि अनुपम नरेंद्र त्रिपाठी (वय 24, रा. साई अपार्टमेंट, बी वींग, मोरया पार्क गल्ली, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवीतील चंद्रहिरा अपार्टमेंटमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून 74 हजार 500 रुपयांचे दागिने लंपास केल्याचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सांगवी पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवून यादव आणि त्रिपाठीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुण्यातील सुस रोड, पाषाण, सुतारवाडी, चांदणी चौक, कोथरूड, कोंढवा, लोहगाव परिसरात घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, त्यांनी 18 ठिकाणी घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.
दाखल गुन्ह्यांमध्ये चोरी केलेल्या मालापैकी आरोपींकडून एकूण 6 लाख 70 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल दोघांकडून जप्त करण्यात आला आहे. त्रिपाठी हा रिअर इस्टेट एजंटचे काम करतो. तर, यादव हा मेकॅनिक असून त्याचे बाणेर येथील ताम्हाणे चौकात गॅरेज आहे. दोघेही मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असून चोरीतील दागिने त्यांनी उत्तर प्रदेश येथील ता. करवी, जि. चित्रकुट येथील एका सोनाराकडे विकल्याचे कबुल केले आह. अशी माहिती पोलिसांनी दिली. हे दागिने हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अप्पर आयुक्त मकरंद रानडे, नम्रता पाटील, वाकड विभागाचे सहायक आयुक्त श्रीधर जाधव, वरीष्ठ निरीक्षक मोहन शिंदे, निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, उपनिरीक्षक संदीप बागुल आदींनी केली.