सरकारने शिक्षणात राजकारण करू नये : खासदार सुप्रिया सुळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1-1-1.jpg)
पिंपरी – शिक्षक आणि प्राध्यापक भरतीसाठी राज्यभर आंदोलने होत आहेत. परंतु, सरकारने अद्याप त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. सरकारने शिक्षणात राजकारण करू नये. प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्याबाबत सरकारने त्वरीत योग्य ती पाऊले उचलावीत. तसेच त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षण संचालक कार्यालयापुढे सोमवार (दि. ५) पासून सेट, नेट, पीएचडी पात्रताधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खासदार सुळे यांनी आज मंगळवारी (दि.६) सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच याप्रकरणात आपण लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
पुण्यातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातही पात्रताधारक धरणे आंदोलनाला बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची मागणी निवदेन आणि आंदोलनाद्वारे सरकारदरबारी पोहचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरकारने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असे आंदोलक डॉ. किशोर खिलारे यांनी सांगितले.
मुंबईतील बैठकीत निर्णय
आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शिक्षण संचालक धनराज माने यांची सोमवारी आंदोलकांनी भेट घेतली. प्राध्यापक भरती बंदीबाबत आज (मंगळवारी) मुंबईत सायंकाळी ५ वाजता शिक्षण आणि वित्त विभागाच्या सचिवांची बैठक होणार आहे. यावेळी याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.