सभागृहात विरोधी पक्षनेत्याचा आवाज घुमणार; खासगी स्पीकरची केली खरेदी
- सत्ताधा-यांचा प्रशासनावर दबाव
- ऐन सभेत केला जातोय स्पीकर बंद
पिंपरी- चुकीच्या कामांवर सभागृहात ठणकाऊन बोलल्यानंतर सत्ताधा-यांना घाम फुटतो. त्यामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचे कुटील कारस्तान सभागृहात केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या गंभीर प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खासगी स्पीकर खरेदी केला आहे. त्यामुळे 11 जूनची विशेष सर्वसाधारण सभा चांगलीच गाजणार आहे.
सत्ताधाऱ्यांना चुकीच्या कामाचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित “दादा” पवार यांनी परखड पण् स्पष्टवक्ता असलेले दत्ता साने यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची धुरा दिली आहे. त्यातच वर्ष, दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकाही असल्याने साने चांगलेच “अक्टीव्ह” झाले आहे. त्यांना पदाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावयाचा आहे. त्यासाठीच त्यांनी विरोधी पक्षनेता आपल्या दारी हे “मिशन” देखील “दादां”च्या समोर जाहीर केले आहे. त्यानंतर आता आणखीन एक नवा “फंडा” साने यांनी शोधला आहे. स्पष्टवक्तेपणामुळे चुकीच्या कामांवर बोलल्यानंतर सत्ताधा-यांची पाचावर धारण बसते. त्यामुळे साने यांची बोलती बंद करण्यासाठी प्रशासनाला दबावाखाली घेऊन सभागृहातील त्यांचा स्पीकर बंद करण्याचा कुटाळखोरपणा केला जातो. त्यामुळे साने यांनी प्रशासनाला आव्हान देत स्वतःचा खासगी स्पीकर खरेदी करून सत्ताधा-यांना धक्का दिला आहे. येत्या 11 जून रोजी होणा-या सर्वसाधारण सभेत साने यांचा आवाज चांगलाच घुमणार आहे.
महापालिकेच्या सभागृहात खासगी स्पीकरचा वापर करण्यासाठी परवाणगी घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना साने यांनी निवेदन दिले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना एखाद्या विषयावर बोलताना त्यांच्यासमोरील माईक जाणूनबुजून बंद केला जातो. आवाज कमी करणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना आपले मत मांडण्यास मज्जाव केला जात आहे. या प्रकारामुळे विरोधकांची मुस्कटदाबी होत असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात स्वतःचा स्पीकर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सभागृहात स्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी साने यांनी आयुक्तांकडे केल आहे. परवानगी द्यायची नसेल तर त्यांनी आम्ही बोलत असताना माईक बंद न करण्याची हमी द्यावी, असे साने यांनी निवेदनात म्हटले आहे.