सन्मान समाजवीरांचा : शिवसेना युवा नेते परशुराम आल्हाट यांची ‘कृतज्ञता’
प्लाझ्मादान करणाऱ्या नागरिकांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शिवसेनेचे युवा नेते परशुराम आल्हाट आणि महिला संघटिका रुपाली आल्हाट यांनी प्लाझ्मादान करणाऱ्या नागरिकांचा सन्मानचिन्ह देवून गौरव केला. प्लाझ्मादान करुन समाजाप्रति असलेले कर्तव्य पार पाडणाऱ्या ‘कोरोनायोद्धांचा’ सन्मान करुन कृतज्ञताही व्यक्त केली.
कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मा दान करुन दोन जीव वाचवण्याचे कार्य करावे, असा संदेश देत आल्हाट दांम्पत्याने ‘प्लाझ्मा दान करुया, दोन जीव वाचवूया…’ असा उपक्रम हाती घेतला होता. त्याला परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
विशेष म्हणजे, परशुराम आल्हाट यांनी स्वत: प्लाझ्मा दान करुन नागरिकांना प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन केले. कोणताही उपक्रम स्वत:पासून सुरू करणाऱ्या आल्हाट यांच्या आवाहनाला नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
दरम्यान, प्लाझ्मा दान करुन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांप्रति कृतज्ञता म्हणून आल्हाट दांम्पत्याने संबंधितांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्याची भूमिका घेतली. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतूक केले आहे.
कोरोनाचा प्रादुभार्व सुरू झाल्यापासून गेल्या सहा-सात महिन्यांत लोकांच्या मदतीसाठी अन्नदान, सॅनिटाईझर वाटप, मास्क वाटप, अर्सेनिक अल्बम औषध वाटप, परिसरात औषध फवारणी, मोफत कोविड तपासणी यासह रुग्णालयातील विविध अडचणींबाबत आल्हाट दांम्पत्य नागरिकांच्या मदतीसाठी धावले आहे. या काळात लोकांच्या संपर्कात आल्यामुळे आल्हाट दांम्पत्य कोरोनाबाधित झाले. मात्र, या रोगावर यशस्वी मात करीत पुन्हा दोघेही सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.