संविधान दिनानिमित्त पालिकेच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रम
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान जनजागृतीपर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर, पिंपरी येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजता महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजता महापालिका मुख्य कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येईल. सायंकाळी चार वाजता स्वप्नील पवार, शेखर गायकवाड व अशोक निकाळजे यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन व व्याख्याते दत्ता देसाई यांचे भारतीय संविधान विश्वात महान या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रात्री ७.०० वाजता सुप्रसिध्द पार्श्वगायिका रेश्मा सोनावणे, पार्श्वगायक रोमियो कांबळे, राखी चौरे व आकाश कांबळे यांच्या देशाची शान भारताचे संविधान या संविधान जनजागृतीपर भव्य प्रबोधनात्मक कार्यक्रमाने सांगता होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.