संगणक अभियंता तरुणीकडे मागितला अश्लील व्हिडिओ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/whatsapp.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्स अॅपवर एक मिनिटाचा अश्लील व्हिडिओ मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ न पाठवल्यास खासगी फोटो मित्रांना पाठवू, अशी धमकी या तरुणीला देण्यात आली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत २४ वर्षीय तरूणी काम करत आहे. या तरुणीला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवण्यात आला. हा व्हॉट्सअॅप क्रमांक परदेशातील असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी कंपनीत काम करताना तरुणीला व्हॉट्सअॅपवर अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला. ‘तुझे खासगी फोटो माझ्याकडे आहेत. मला ब्लॉक करू नकोस, जर ब्लॉक केलेस तर तुझे खासगी फोटो मुंबईच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवणार’, असे मेसेजमध्ये म्हटले होते.
काही वेळाने त्याच क्रमांकावरुन तरुणीचा मॉर्फ केलेला फोटो देखील पाठवण्यात आला. हा फोटो तुझ्या मित्रांना पाठवणार आहे. असे नको असेल, तर एका मिनिटाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ मला पाठव. तो मी कोणाला दाखवणार नाही, असा मेसेजही पाठवण्यात आला. यामुळे ही तरुणी घाबरली. तसेच पोलिसात गेलीस तर बघून घेईल, अशी धमकीही तिला देण्यात आली होती. अखेर, तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.