श्री क्षेत्र आळंदीतील रस्त्यांना अखेर ‘गती’ !
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/06/Alandi-Road.jpg)
- आमदार महेश लांडगे यांनी ‘शब्द’ पाळला
- प्रदक्षिणा मार्ग एका रात्रीत चकाचक
- तमाम आळंदीकरांनी व्यक्त केले समाधान
पिंपरी – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला श्रीक्षेत्र आळंदीतील पालखी पालखी मार्ग आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न आता निकालात निघाला आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पालखी मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चाकण चौक ते नवीन पुलापर्यंचा पालखी मार्ग चक्क एका रात्रीत चकाचक केला आहे. अन्य मार्गांच्या दुरुस्तीलाही गती देण्यात आली आहे. त्यामुळे तमाम आळंदीकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र आणि परराज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आळंदीमध्ये ‘आषाढ वारी आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांसाठी लाखो भाविक भेट देत असतात. आषाढ वारीला तर आळंदीमध्ये वारक-यांचा महापूर लोटतो. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी पालखी मार्गासह अंतर्गत रस्त्यांची तात्पुरर्ती डागडूजी केली जात होती. मात्र, काही दिवसांतच या रत्यांची दुरवस्था होत होती. त्यामुळे आळंदीतील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर होता.
दरम्यान, आळंदी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आळंदीकरांसाठी प्रशस्त रस्ते आणि पायाभूत सोयी-सुविधा देण्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे तमाम आळंदीकरांनी भारतीय जनता पक्षा निवडणुकीत साथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपेक्षेप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीकरांसाठी दररोज २ लाख लीटर पाणी पिण्यासाठी पुरवठा करण्यात आला. आता ‘खड्डेमुक्त आळंदी’ असा संकल्प करुन आळंदीतील अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, आषाढ वारी जवळ आली की, रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत कायम चर्चा होते. मात्र, यावेळी वारक-यांना सोयी-सुविधा पुरविण्यासह रस्ते प्रशस्त करण्याबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पुढाकाराने प्रांताधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामाध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सकारात्मक भूमिका घेत आळंदीतील पालखी मार्गासह अंतर्गत रस्त्यांच्या कामाला गती दिली आहे. विशेष म्हणजे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेवून रस्त्यांचा प्रश्न निकालात काढण्याबाबत सकारात्मक पुढाकार घेतला आहे.
—————
पायाभूत सुविधा देण्यास कटीबद्ध- उमरगेकर
श्रीक्षेत्र आळंदीतील प्रदक्षिणा मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने मशीनच्या सहाय्याने डांबरीकरणास सुरुवात केली. चाकण चौक ते नवीन पुलाचे खड्डे भरुन काढले आहेत. आता हजेरी मारुती मंदिर ते महाद्वार चौक आणि पालिका चौक ते महाद्वार चौक या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. आगामी तीन-चार दिवसांत या रस्त्यांचे कामही पूर्ण करण्यात येणार आहे. वारक-यांसह आळंदीकरांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्याबाबत आम्ही कटीबद्ध आहोत, असे मत नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी व्यक्त केले.