breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी वाकडमधील पाच रस्ते अडवले: तारामण कलाटे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी वाकड भागातील पाच रस्ते वेगवेगळ्या माध्यमातून कशा प्रकारे अडवून ठेवले आहेत याचा एका ज्येष्ठ शिवसैनिकानेच सोमवारी (दि. ८) महापालिकेत पत्रकारांसमोर पाढा वाचला. शिवसेनेच्याच एका माजी खासदाराने आणि एका माजी आमदाराने लेखी पत्र देऊनही हे रस्ते खुले केले गेले नाहीत. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनीही स्वतः महापालिका आयुक्तांना फोन करून हे रस्ते खुले करण्याची सूचना केली. तरीही राहुल कलाटे यांनी बिल्डर आणि स्वतःच्या फायद्यासाठी वाकड भागातील नागरिकांना नाहक त्रास देण्याच्या हेतूने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दमबाजी करत हे रस्ते आजपर्यंत अडवून ठेवले आहेत, असा गंभीर आरोप या ज्येष्ठ शिवसैनिकाने केला. विशेष म्हणजे यातील दोन रस्त्यांचे महापालिकेने डांबरीकरण सुद्धा केलेले आहे. तरीही हे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जात नाहीत. असे असताना राहुल कलाटे हे महापालिकेच्या सभागृहात कोणत्या तोंडाने विकासाकामांवर बोलतात?, असा सवाल ज्येष्ठ शिवसैनिकाने केला. ज्येष्ठ शिवसैनिकानेच हा पर्दाफाश केल्यानंतर त्यावर राहुल कलाटे काय स्पष्टीकरण देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तारामण केसू कलाटे असे त्या ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव आहे. ते आज महापालिकेत पत्रकारांशी बोलताना शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

तारामण कलाटे म्हणाले, “शिवसेना गटनेते राहुल कलाटे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी वाकड भागातील पाच रस्ते अडवले आहेत. त्यामध्ये नागरिकांनी स्वतःहून महापालिकेला लिहून दिलेल्या जागेवर झालेल्या रस्त्यांचाही समावेश आहे. राहुल कलाटे यांनी अडवलेल्या रस्त्यांमध्ये दोन डांबरीकरण केलेले आणि महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यातील दोन आणि खासगी जागेतील एका रस्त्याचा समावेश आहे. नागरिकांना नाहक त्रास देण्याच्या हेतूने तसेच बिल्डरांचा आणि स्वतःचा फायदा व्हावा या हेतूने राहुल कलाटे यांनी हे रस्ते अडवलेले आहेत.

वाकडमधील सर्व्हे नंबर १७६ मधील पूर्व-पश्चिम हा १८ मीटर रस्ता महापालिकेच्या नवीन विकास आराखड्यातील आहे. या विकास आराखड्याच्या भाग नकाशामध्ये येथील सद्गगुरू कॉलनी क्रमांक २ व ३ मधील सर्व्हे नंबर १७६/१/८ मध्ये ६ मीटर वहिवाटीचा रस्ता आहे. परंतु, हा रस्ता सर्व्हे नंबर १७६/१/९/१ मध्ये वहिवाटीचा रस्ता दाखवून तेथील घरे अनधिकृत म्हणून खुणा करून दोन्ही रस्ते अडवण्यात आले आहेत. जाण्या-येण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हक्काचा रस्ता नसल्याने या भागात गुंठा-दोन गुंठा जागा घेऊन घरे बांधलेल्या नागरिकांना चार किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नगरसेवक आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनीच हे रस्ते अडवले असून, नागरिकांच्या होणाऱ्या त्रासाला ते जबाबदार आहेत.

यासंदर्भात शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मुळशीचे शिवसेनेचे माजी आमदार शरद ढमाले या दोघांनीही वाकडमधील डीपीचे अडवलेले रस्ते नागरिकांसाठी खुले करण्याचे महापालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले होते. परंतु, महापालिका प्रशासनाने राहुल कलाटे यांच्या दबावामुळे आजतागायत हे रस्ते नागरिकांसाठी खुले केलेले नाहीत. एवढेच नाही तर शिवसेनेचे मावळ मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील महापालिका आयुक्तांना फोन करून राहुल कलाटे यांनी अडवलेले रस्ते नागरिकांसाठी खुले करण्याची सूचना केलेली आहे. तरी देखील हे रस्ते खुले केले जात नाहीत.

वाकडमधील सर्व्हे नंबर १४४ केमसेवस्तीमधील मूळ मालकांनी महापालिकेला स्वतःहून रस्त्यासाठी जागा लिहून दिली. त्यानंतर महापालिकेने याठिकाणी रस्ता केला. त्यावर डांबरीकरण केले. इतर सुविधाही पुरविल्या. नंतर रस्त्याच्या मध्यभागी भूमिगत सांडपाणीवाहिनीचे काम करण्यात आले. परंतु, या रस्त्याची दुरूस्ती काही केली नाही. राहुल कलाटे यांनी जाणूनबूजून हे काम अडवून ठेवल्यामुळे आज रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. या रस्त्याची दुरूस्ती करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत २०१६ पासून पाठपुरावा करत आहोत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही महापालिकेला लेखी पत्र दिले आहे. परंतु, त्यावर आजपर्यंत कार्यवाही होत नाही. शिवसेनेचाच गटनेता अशा प्रकारे वाकड भागातील रस्त्यांची अडवणूक करतो, ही वाकडकरांसाठी दुर्दैवाची बाब आहे.

वाकडमध्ये रस्त्यांची अडवणूक करायची आणि महापालिकेच्या सभागृहात येऊन विकासकामांवर बोलायचे हा राहुल कलाटे यांचा दुटप्पीपणा आहे. आज ना उद्या कोणी तरी आमची दखल घेईल या आशेने आम्ही महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत, असे ज्येष्ठ शिवसैनिक तारामण कलाटे यांनी सांगितले. एका शिवसैनिकानेच पर्दाफाश केल्यानंतर शिवसेना गटनेते राहुल कलाटे आता त्यावर कोणते स्पष्टीकरण देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button