‘शिव’भोजन थाळीचा दर्जा खलावला; लाभार्थ्यांची तक्रार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/6-9.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवभोजन योजना सुरु केली. मात्र, अजून एक महिनाही उलटला नाही. तोपर्यंत लाभार्थ्यांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. त्यात वल्लभनगर येथील एसटी आगारातील शिवभोजन थाळीचे जेवण निकृष्ट असल्याची तक्रार एका लाभार्थ्यांने केली आहे.
राज्य सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागामार्फत, गरजू आणि गरीब लोकांसाठी 10 रुपयांत “शिवभोजन’ थाळी योजना सुरू करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड महापालिका, वल्लभनगर एसटी स्थानक आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्या उपहारगृहांमध्ये योजना राबविली जात आहे. सर्व केंद्रांतील अन्नपदार्थांची वेळोवेळी तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषधे प्रशासनावर टाकण्यात आली असताना वल्लभनगर येथील एस.टी.स्थानकाच्या उपहारगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे शिवभोजन देण्यात आल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.
विशाल खंदारे म्हणाले,””शिवभोजन थाळीमधील सोयाबीनची भाजी आणि डाळीची गुणवत्ता खराब होती. यापूर्वीही येथे 2 ते 3 वेळा निकृष्ट जेवण मिळाले. योजनेअंतर्गत, जेवणाचा दर्जा योग्य राहिला पाहिजे. अन्यथा ही जनता आणि सरकारची फसवणूक ठरेल. अन्नपदार्थांची आकस्मिक तपासणी केली जावी. निकृष्ट दर्जाचे जेवण बनविले गेल्याचे निदर्शनास आल्यास केंद्र चालकांचे परवाने निलंबित झाले पाहिजेत.”अशीही मागणी त्यांनी केली आहे.