शिवनेरीवर देशातील आगळा-वेगळा शिवजन्मोत्सव साजरा होईल – खासदार अमोल कोल्हे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/1kolhe_0.png)
पुणे – किल्ले शिवनेरीवर आगळा वेगळा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येईल. शिवनेरी गडाचे 30 ते 40 टक्के काम पूर्ण झाले असून देशभरात सगळ्यात मोठा शिवजन्मोत्सव म्हणून याकडे पाहिलं जाईल, असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिरुरचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगिलले.
डॉ.अमोल कोल्हे म्हणाले, या पुढच्या काळात किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव भरवण्याचा एक वेगळा विचार आहे. हा महोत्सव केवळ शिवजयंती किंवा शिवजन्मतिथीला धरून नसेल. शिवाजी महाराजांचा संपूर्ण शिवचरित्र जागवणारा वेगळा शिवजन्मोत्सव असेल. याबाबत 30 ते 40 टक्के काम अगोदरच झाले आहे. त्याचे मूर्त रूप लवकरच बघायला मिळेल.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या विजयानंतर शुक्रवारी किल्ले शिवनेरी गडदेवता शिवाई देवीचे दर्शन घेत शिवजन्मस्थानास अभिवादन केले. शिवकुंज येथील बाल शिवाजी आणि जिजाऊंच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. निवडणूक प्रचाराचा प्रारंभही डॉ.कोल्हे यांनी शिवनेरीवर दर्शन घेऊनच केला होता. यानंतर विजयी ठरल्यावर त्यांनी शिवनेरीवर हजेरी लावली. डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन पुढील कामाला सुरुवात केली आहे.