शिक्षकाची नक्कल केली म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/bhosari-student-assoulted-by-teacher.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिक्षकाची नक्कल केली म्हणून एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण करून त्याला घरी न सोडता शाळेतच बसवून ठेवल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 2) दुपारी पाचच्या सुमारास नूतन महापालिका प्रशाला बो-हाडेवाडी, मोशी येथे घडला. याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक कळसाईत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बो-हाडेवाडी मोशी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेची नूतन महानगर प्रशाला ही शाळा आहे. या शाळेत फिर्यादी यांचा मुलगा शिकत आहे. हा विद्यार्थी सरांची नक्कल करतो, असा गैरसमज झाल्याने शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक कळसाईत यांनी त्याला काठीने व हाताने पाठीत मारहाण केली. यामध्ये या विद्यार्थ्यांच्या पाठीला जखम झाली. शाळा सुटल्यानंतर देखील त्याला घरी जाऊ न देता शाळेतच थांबवून ठेवले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.