शहरात रस्ते साफसफाईसाठी रोडस्वीपर मशीन निविदा राबविणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/RSB-6000.png)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – कचरा संकलन व वाहतुकीच्या कामाप्रमाणे शहरातील रस्ते, मंडई आणि मोकळ्या जागांची यांत्रिकी पध्दतीने (रोड स्वीपर मशीन) साफसफाई करण्यासाठी आठ वर्षांचा ठेका देण्याची तयारी सुरू आहे. या कामाची निविदाप्रक्रिया कामकाज सल्लागार संस्थेमार्फत सुरू आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आठ वर्षांसाठी काम देण्याचा निर्णय महापालिका सर्वसाधारण सभेत घेण्याची शिफारस स्थायी समितीने केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मे. डी. एम. एंटरप्रायजेस व मे. बीव्हीजी इंडिया यांना दोन वर्षांसाठी हे रोडस्वीपरचे काम दिले होते. परंतु, त्याची मुदत संपुष्टात आली असून 1 जून 2019 पासून त्यांनी काम बंद केले आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, मंडई आणि मोकळ्या जागांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याचे कामाची निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी मे. टंडन अर्बन सोल्युशन प्रा. लि. या संस्थेकडून काम करून घेतले जात आहे.
या संस्थेने शहरातील एकूण 2748 किमी रस्त्यांची साफसफाई करायची असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे काम कचरा संकलन व वाहतूक निविदेच्या कामाप्रमाणे आठ वर्षांसाठी दिले जाणार असून त्यासाठी सुमारे 97 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. रोडस्वीपर मशीनसाठी आठ वर्षांसाठी काम देण्यास कायदेशीर अडचण टाळण्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली जाणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला असून महापालिका सभेच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, रोड स्वीपरचाही ठेका आठ वर्षांसाठी दिला जाणार असल्याने त्याच्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.