शहरात आज कोरोनाच्या सहा रुग्णांची नोंद, तीन महिला, तीन पुरुष
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आज मंगळवारी (दि. १४) एकाच दिवशी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये तीन महिला आणि तीन पुरुष आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 30 झाली आहे. तर, आजपर्यंत 43 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, मागील सात दिवसांत 23 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
कोरोना बाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील हे सहा रुग्ण आहेत. त्यामध्ये 29, 32, 63 वर्षाचे तीन पुरुष रुग्ण आहेत. तर, 53, 54 आणि 55 वय वर्ष असलेल्या या तीन महिला रुग्ण आहेत. हे रुग्ण भोसरी, खराळवाडी, गांधीनगर भागातील आहेत. दरम्यान मागील सात दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. आज एकाच दिवशी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 8 एप्रिल पासून शहरात दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. मागील सहा दिवसांत तब्बल 23 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन, 12 एप्रिलला पाच आणि 13 एप्रिल रोजी दोन आणि आज 14 एप्रिल एकाच दिवशी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी – चिंचवड शहरातील 43 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 30 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 27 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, तीन सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (दि. 9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.