शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाईच्या कामात रिंग; निविदा रद्द करा
विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्यात येणार आहे. त्या कामांच्या निविदा प्रसिध्द करण्यात आल्या. मात्र, देशभर निविदा प्रसिध्द करुनही सहा ठेकेदारांनी आलटून-पालटून निविदा भरली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी कामात रिंग झाली असून निविदा प्रक्रिया रद्द करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफ सफाई करणे या कामांचा निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये या निविदांमध्ये रिंग होण्याची शक्यतेबाबत कळविले होते. त्याप्रमाणे तांत्रिक छाननीमध्ये या निविदेसाठी देशभर निविदा प्रसिध्द करुनही सहाच ठेकेदरांनी आलटून पालटून निविदा भरलेल्या आहेत. हे सिध्द होत आहे.
मनपाचे स्वच्छतेचे काम करणा-या ठराविक ठेकेदारांनीच या निविदा भरलेल्या आहेत. या कामासाठी संयुक्त निविदा न काढता सहा पँकेजस मध्ये विभागणी करुन सात वर्षासाठी निविदा काढण्याची शिफारस सल्लागाराने का केली ? या निविदेमुळे सुमारे एक हजार कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. त्यांच्या भविष्याचे काय ? याबाबत सविस्तर स्पष्टीकरण देण्यात यावे. तसेच या निविदा प्रक्रीयेची संपूर्ण माहिती देण्यात यावी.
या निविदे प्रक्रीयेमध्ये स्पर्धा न झाल्यामुळे सफाईच्या कामात अधिकचा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे महानगरपालिकेचा तसेच पर्यायाने सार्वजनिक निधीचा अपव्यय होईल. त्यामुळे सदरची निविदा प्रक्रीया रद्द करुन पुनश्च पारदर्शक पद्धतीने निविदा स्पर्धा घेण्यात याव्यात. असेही म्हटले आहे.