breaking-newsपिंपरी / चिंचवड

शहरातील खासगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची निर्मिती करा

त्यासाठी महापालिका आणि खासगी रुग्णालय समिती गठीत व्हावी

– इरफान सय्यद यांची जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा पादुर्भाव वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपुर व औरंगाबाद, पिंपरी चिंचवड या भागात मोठ्या प्रमाणावर रूग्ण आहेत. कोरोना विषाणूस अटकाव करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विविध उपाययोजना होत आहेत. राज्यातील संबंधित जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी, शहरातील महापालिका आयुक्त यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा देखील कोरोनाशी लढा देण्यासाठी चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड, पुणे आणि जिल्ह्यात जवळपास ३५० कोरोनाचे रूग्ण आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणावर रुग्णाची तपासणी सुरुच आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोनाची संख्या पन्नाशीकडे सरकत आहे. त्यामुळे शहरात कोरोना विषाणूच्या उपचारासाठी शहरातील सर्व खासगी रूग्णालये अधिग्रहण करून त्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्याची निकड भासू लागली आहे.

याबाबत भोसरी-खेड विधनासभा मतदारसंघाचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष नवलकिशोर राम तसेच पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका प्रशासन आणि खासगी रुग्णालयतील तज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करावी. त्याद्वारे खासगी रुग्णालयात विलीगीकरण कक्षाची निर्मिती व्हावी. कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी डॉक्टरांसह प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देशासह महाराष्ट्रातील अनेक भागातील खासगी रुग्णालयात, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ती अधिग्रहण करून, त्यात विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ अन्वये कोव्हीड १९ साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सेवा अधिष्ठाता, शासकीय वैदयकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरातील सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयाची क्षमता व रूग्ण संख्येची वाढ विचारात घेता, खासगी रुग्णालयाचा सहभाग आणि विलगीकरण कक्षाची आवश्यकता भासणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात कोरोना रुग्णांना उपचार मिळत आहेत. मात्र, तेथील आरोग्य सोयी-सुविधांवर मोठा ताण येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय नियमानुसार कोणतीही खबरदारी वायसीएम रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात येत नाही, अशा थेट तक्रारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे गेल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात नामांकित दहा खासगी रुग्णालये आहेत. ज्यांच्या खाटाची संख्या १०० च्या आसपास असुन, अतिदक्षता विभागात १० खाटा व व्हेन्टीलेटर आणि विविध साधनसामग्री उपलब्ध आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य सुविधेवरील ताण कमी करण्यासाठी शहरातील नामांकित खासगी रुग्णालयांना कोरोना उपचारासाठी शासनाने अधिग्रहण करण्याचे आदेश द्यावेत. जेणेकरून सार्वजनिक आरोग्य व वैदयकीय सुविधेवरील ताण थोडा कमी होऊन, या खासगी रूग्णालयांना सामाजिक दातृत्व निभावण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.

यासाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी व महापालिका आयुक्त यांनी जबाबदार अधिकारी या नात्याने शहरातील सर्व खासगी रुग्णालय व्यवस्थापन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, महापालिका आणि खासगी रुग्णालय प्रशासनाची समिती गठीत करावी. खासगी रुग्णालयात उपलब्ध खाटा, व्हेन्टीलेटर, विविध साधनसामग्री, डॉक्टर, सपोर्टीग स्टाफ यांची पाहणी करावी. तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावे. त्यामुळे शहरातील कोरोना लढ्यासाठी सज्ज राहून, त्याचा मुकाबला अधिक सक्षमरित्या करता येईल. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा, असे या पत्रात इरफान सय्यद यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button