वैद्यकीय विभागाला भ्रष्टाचाराचा आजार – नगरसेवक संदीप वाघेरे यांचा आरोप
![Corruption disease to medical department - Allegation of corporator Sandeep Waghere](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/sandip-waghere.jpg)
डॉ. पवन साळवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भ्रष्टाचाराचा आजार झाला आहे. कोरोनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. या बाबत चौकशी करून डॉ. पवन साळवे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. या बाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना या बाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटल मध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते. तसेच पीएमआरडीयेने देखील आण्णा साहेब मगर स्टेडियमवर ८०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या ठिकाणी सध्या २०० पेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने खाटा भरलेल्या नाहीत. असे चित्र असताना ऑटो क्लस्टर येथे कोविड रुग्णालय सुरु ठेवण्याचा खटाटोप का केला जात आहे, असा सवाल संदीप वाघेरे यांनी या वेळी उपस्थित केला. या ठिकाणी सुरु असलेले रुग्णालय तत्काळ बंद करावे. येथील सर्व सुविधा इतर ठिकाणी इतर ठिकाणी हलवाव्यात अशी मागणी या वेळी वाघेरे यांनी केली.
ऑटो क्लस्टर येथील असणारी ठेकेदाराची निविदा पूर्वी अपात्र असतानाही ती पात्र करण्यात आली आहे. निविदेत नमूद असताना त्या पेक्षा जास्त कर्मचारी त्या ठिकाणी डॉ. पवन साळवे यांनी नियुक्त केले. संबधीत कर्मचार्यांची संख्या देखील या ठिकाणी कमी आहे. कोणताही परवाना नसताना जेवणाचा ठेका संबंधित ठेकेदाराला दिला आहे. चादर व बेडशीट खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या बाबत चौकशी करून डॉ. पवन साळवे व संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदनाद्वारे केली.