breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वैद्यकीय विभागाचा निष्काळजीपणा; राजभवन सत्कारास नावे पाठविले नसल्याचे उघड

वैद्यकीयच्या संबंधित अधिका-यावर कारवाई करा, वायसीएम कर्मचा-यांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असामान्य काम करणा-या डाॅक्टरांसह अन्य कर्मचा-यांची राजभवन सत्कारास महापालिकेच्या वैद्यकीय विभाग आणि वायसीएम रुग्णालयातील वरिष्ठांनी जाणिवपुर्वक नावेच पाठविले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात अहोरात्र काम करुन मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी ठेवणा-या डाॅक्टर व कर्मचा-यांना राज्यपालांच्या हस्ते होणा-या सत्कारापासून दूर रहावे लागणार आहे. दरम्यान, कोरोना योध्दा म्हणून काैतूक करणा-यांचे नंतर सोयीस्कर विसर पडल्याने संबंधित वरिष्ठांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी वायसीएमच्या कर्मचा-यांकडून होवू लागली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डाॅक्टर व अन्य कर्मचारी कोविड रुग्णांच्या उपचार अहोरात्र करत आहेत. राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तेव्हा वायसीएमचा मृत्यूदर एक टक्क्यापेक्षाही कमी होता. तसेच राज्यात सर्व शासकीय रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालय, खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांना शासनाने प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून पुणे विभागात सर्वाधिक प्लाझ्मा संकलन आणि वितरण करण्याचे काम वायसीएम रुग्णालयाने केले आहे.

राज्यात कोरोना महामारीच्या काळात असामान्य काम करणाऱ्या डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते १५ आॅक्टोंबरला राजभवन मुंबई येथे सत्कार होणार आहे. त्यामुळे असामान्य काम करणा-या कर्मचा-यांची नावे पाठवण्याचे सर्वांना आदेश देण्यात आले होते. असामान्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे सर्वांकडून जाहीर करण्यात आली. राज्यातील सर्वच विभागांना या पुरस्कारामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. मात्र, त्या जाहीर केलेल्या नावांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या एकाही कर्मचाऱ्यांचे नाव नाही. त्यामुळे शासनाला पिंपरी चिंचवडचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वायसीएमच्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत ८२ हजार ५०३ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील ७६ हजार ७६३ रुग्ण बरे झाले असून, १ हजार ५०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ९३ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण हे १.२७ एवढे आहे.

.. म्हणून महापाैरांकडे कर्मचा-याची ही मागणी

कोविड महामारीत पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयांसह सर्व रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, पॅरामेडीकल्स जीवावर उधार होवून काम करीत आहेत. त्यात काही कर्मचारी कोविड संक्रमित झाले. काही जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोविड योध्दा म्हणून महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून सर्वांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी सोशल वर्कर महादेव बोत्रे, विजय मुंडे, वैभव देवकर, गणेश खत्री,शलमाने मिसाळ, रमेश चोखे आदींनी महापाैर माई ढोरे यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button