वेतनापोटी 19 डाॅक्टरांनी जादा रक्कम लाटली; ‘त्या’ रक्कमा वसुल न करण्याचे आयुक्तांचे आदेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/6-2.jpg)
‘वैद्यकीय शाखाप्रमुख’ पद महापालिका आस्थापनेवर मंजूर नाही, त्या पदानूसार सुधारित वेतनश्रेणी केलेली लागू
पिंपरी |महाईन्यूज|विकास शिंदे
शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 19 डाॅक्टरांनी सुधारित वेतनश्रेणी लागू करुन वेतनापोटी लाखो रुपये लाटले आहेत. त्या डाॅक्टरांनी लाटलेली सुधारित वेतनश्रेणी पालिकेने रद्द करुन त्यांच्या वेतनातून वसुलीचे आदेश दिले होते. परंतू, यापुर्वी अदा केलेल्या कोणत्याही जादा वेतनाची व सेवानिवृत्ती वेतनाच्या रक्कमेची वसुली तुर्तास करु नये, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतून वेतनापोटी जादा लाटलेल्या रकमाची वसूली कोण? करणार असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
शासनाच्या नगरविकास विभागाकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या आस्थापनेवरील मंजूर पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मंजूरी देण्यात आलेली होती. त्यानूसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय शाखाप्रमुख व वैद्यकीय उपशाखाप्रमुख या अभिनामाची पदे अस्तित्वात नाहीत. तरीही वैद्यकीय विभागातील 19 डाॅक्टरांनी शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून तत्कालीन वैद्यकीय विभाग प्रमुखाकडून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे काही विशेष तज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या वेतनामध्ये तफावती निर्माण झाल्या होत्या. याबाबत डाॅ. गोरे यांनी सुधारित वेतनश्रेणी मिळण्यासाठी पालिकेसह आपले सरकारवर तक्रार केली. त्यामुळे सर्वांचेच बिंग फुटले.
प्रस्तूत शासन निर्णयानूसार विशेष तज्ञांना दिलेल्या सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत 22 आॅगस्ट 2008 चे आदेश शासन निर्णयास बाधा आणणारे आहेत. त्या सर्वांना नोटीस बजावून सदरचे आदेश रद्द करुन त्यानूसार सुधारित वेतनश्रेणी रक्कम कार्यरत असणा-या अधिका-याच्या वेतनातून तर सेवानिवृत्त झालेल्या अधिका-याच्या सेवानिवृत्तीची रक्कम सेवानिवृत्ती वेतनातून वसुल करणेचे योग्य ते आदेश विभागाकडून निर्गत केले होते. त्या सर्व अधिका-यांची पुनश्च वेतननिश्चिती करुन त्या रक्कमा अदा वसुलीचे आदेश दिले होते.
या आदेशाविरोधात 15 तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांना उच्च न्यायालयात क्रमांक 3269|2018 अन्वये रिट पिटीशन दाखल केली. त्यावर तज्ञ वैद्यकीय अधिका-यांची सुनावणी घेण्यात आली. त्यावर आयुक्तासह अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, कायदा सल्लागार, अति.आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक गठीत करण्यात आली. त्या सर्वांनी 4 डिसेंबर 2019 रोजी संबंधितांची बैठक झाली. त्यानूसार विविध निर्णय घेण्यात आले.
दरम्यान, तज्ञ वैद्यकीय अधिका-यांना लागू केलेली वरिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात आले. त्या सर्व तज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या पुनश्च वेतननिश्चिती करण्यात यावी, पालिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिका-याच्या सेवानिवृत्त वेतनाची त्याच्या मूळ वेतनश्रेणीनूसार पुर्ननिश्चिती करावी, तज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या वेतनाची त्यांचे मुळ वेतनश्रेणीनूसार पुर्ननिश्चिती करणेत येवून यापुढील वेतन व सेवानिवृत्ती वेतन अदा करावे, विशेष म्हणजे या प्रकरणी यापुर्वी अदा केलेल्या कोणत्याही जादा वेतनाची व सेवानिवृत्ती वेतनाच्या रकमेची वसुली तुर्तास करण्यात येवू नये, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहे.