विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वायसीएम रुग्णालयाला भेट
पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली.
यावेळी महापौर माई ढोरे, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक बाबू नायर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात आगमन झाले. त्यांनी शहरातील करोनाची परिस्थिती, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली. दरम्यान, फडणवीस यांचे आगमन होताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली.
पिंपरी-चिंचवड शहरात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी लढाई सुरु आहे. त्याला काही प्रमाणात यश येत आहे. प्रशासनाने नियोजन चांगले केले आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून चांगले काम करता येईल. गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. पावसाळ्यात अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील याबाबत आयुक्तांकडून माहिती घेतली आहे. स्वतंत्र लॅबची मागणी संदर्भात मी शासनाकडे तशी विनंती करेल, असे फडणविस यावेळी म्हणाले.