breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विधानसभा तिकीटासाठी दोन्ही आमदारांना हवाय मुख्यमंत्र्यांचा ‘शब्द’

  • शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या बदल्यात आमदारांची खेळी
  • म्हणून, भाजपचे दोन आमदार बसलेत आडून?, चर्चेला उधाण

पिंपरी, (महान्यूज) – एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालेली असताना दुसरीकडे मात्र भाजप आमदार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी द्विधा मनस्थितीत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने आपल्याला कात्रजचा घाट दाखविला तर यावेळी मोदींचे हात बळकट करण्यासाठी घेतलेली मेहनत पाण्यात जाण्याची भिती आमदारांच्या मनात निर्माण झाल्याचे दिसते. त्यांना विधानसभेच्या उमेदवारीचा पक्षश्रेष्ठींकडून शब्द जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत ते युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत, अशी चिंचवड आणि भोसरीच्या आमदारांची भूमिका असल्याची चर्चा आहे.

  • मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. शिवसेना-भाजप युती असल्यामुळे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे तर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे. तसे फर्मान देखील त्यांना पक्षाच्या वरीष्ट पातळीवरून आले आहे. परंतु, उमेदवारांशी असलेले वैर मनात सलत असल्यामुळे दोघांचाही याबाबत नाईलाज झाला आहे. दोघांच्या मनात नसले तरी वरवर का होईल प्रचार करत असल्याचा देखावा करावा लागणार आहे.

मुळात आमदार जगतापांनी आजपर्यंत खासदार बारणे यांना पाडण्याचेच कारस्तान केले आहे. आता दोघांनीही युतीच्या सरकारमध्ये राहून सत्तेची उब सोसली आहे. शिवसेना-भाजपची राज्यात युती असताना स्थानिक प्रश्नांवरून बारणे आणि जगताप यांच्यातील शाब्दीक संघर्ष पिंपरी-चिंचवडकरांनी डोळ्याने पाहिला आहे. एवढे अटीतटीचे वैर मनात सलत असताना बारणे यांचा प्रचारप्रमुख म्हणून काम करण्याची भूमिका जगतापांना किती रुचणार आहे, हे सर्वांनाच कळते. तर, तिकडे खासदार आढळराव पाटील आणि आमदार लांडगे यांच्यातील परिस्थिती काही वेगळी नाही. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पैलवान लांडगे यांनी आढळरावांना चितपट करण्याची भाषा केली होती. बैलगाडा, रेडझोन, पुणे-नाशिक महामार्ग या प्रश्नांवर दोघांनी आजवर नुसता कथ्याकूट केला. अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमदार लांडगेंनी खासदार आढळरावांची प्रतिमा धुळीला मिळवली.

  • ही परिस्थिती असताना पुन्हा युतीच्या म्होरक्यांनी या दोघांवर लोकसभेच्या प्रचाराची धुरा सोपविली आहे. दोघेही प्रचार करण्याच्या भूमिकेत सध्या तरी दिसत नाहीत. लांडगे हे तर आढळरावांच्या व्यासपीठावर देखील बसू लागले आहेत. परंतु, त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची धुरा न सांभाळण्याचा हट्ट केला आहे. तथापि, युतीच्या उमेदवारांचा प्रचार केला आणि आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने आपल्याला नारळ दाखविला तर करायचे काय, असा प्रश्न दोघांच्याही मनात भेडसावत आहे. त्यामुळे नेमकी कोणती भूमिका घ्यावी, हा प्रश्न समोर आहे. पक्षश्रेष्ठींनी आगामी विधानसभेच्या तिकीटाचा शब्द द्यावा, अशी अपेक्षा दोघांना लागली आहे, असा अंदाज सध्याच्या स्थितीवरून वर्तविला जात आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button