विकास कामांवर होणा-या सुमारे बारा कोटींच्या खर्चास स्थायीची मान्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/222pcmc_65_1.jpg)
पिंपरी – शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 12 कोटी 33 लाख 32 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज मंगळवारी (दि. 19) मान्यता देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पीएमपीएमएलसाठी जून 2018 करिता संचलनतूटी पोटी सहा कोटी व सवलतीचे पासेससाठी एक कोटी 50 लाख रुपयांसह सुमारे सात कोटी 50 लाख रुपये, महापालिकेच्या तालेरा रुग्णालयातील नवीन इमारतीमध्ये नवीन गॅस पाईपलाईन करण्याकरीता आवश्यक लागणारा कॉम्प्रेसर विद अक्सेसरीज व व्हॅक्युम पंप या उपकरण/साहित्य खरेदीसाठी येणा-या सुमारे 25 लाख 50 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत जन्म-मृत्यू नोंदीची डेटा एन्ट्री करणे, नोंदी दुरुस्ती करणे व दाखले वितरीत करण्यासाठी येणा-या सुमारे 86 लाख रुपयांच्या खर्चास, गुलाब पुष्प उद्यानाजवळील मोकळ्या जागेवर प्राणी संगोपन केंद्र उभारण्यासाठी येणा-या सुमारे 26 लाख 47 हजार रुपयांच्या खर्चास, मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौकापर्यंत मनपाचे मंजूर विकास आराखड्यातील 45 मीटर रुंद बीआरटीएस रस्ता विकसीत करण्यासाठी व तसेच रेल्वे लाईन नजिक अस्तित्वात असलेले सब स्टेशन स्थलांतरित करण्यासाठी स्थलांतरन शुल्क 38 लाख 86 हजार रुपये अदा करण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
चिंचवड मैलाशुद्धीकरण केंद्राअंतर्गत काळभोरनगर, मोहननगर रामनगर या भागात उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नालिका टाकण्यासाठी व जलनिःसारण विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 36 लाख 99 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.