‘वायसीएम’मध्ये करोना व्हायरस दक्षतेसाठी अतिदक्षता कक्ष सुरु
![Head of Medical Department of YCM, the authority to purchase medicine up to Rs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/ycm-photo.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
करोना व्हायरसच्या दक्षतेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) अतिदक्षता कक्ष सुरू केला आहे. त्यामध्ये १५ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
‘करोना व्हायरस’ने चीनमध्ये थैमान घातले आहे. हा व्हायरस भारतातदेखील दाखल होण्याची शक्यता आहे. त्याबाबतची भीती व्यक्त केली जात आहे. या शहरात असंख्य नागरिक बाहेरून येत असतात. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये करोना विषाणू रुग्णांसाठी नव्याने स्वतंत्र कक्ष तत्काळ स्थापन करावा. विषाणूचा प्रादूर्भाव रोखावा. त्याला प्रतिबंध व नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना त्वरित राबविण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक तसेच आरोग्य, वैद्यकीय विभागाकडून केली जात होती. त्याची दखल घेत महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील ‘वायसीएम’ रुग्णालयामध्ये संशयित करोना रुग्णांसाठी अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे डॉ. वाबळे यांनी महापौर माई ढोरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.