‘वायसीएम’मधील 17 व्हेंटिलेटर, 40 मल्टिपॅरा मॉनिटर्स खरेदीत गैरव्यवहार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/maruti-bhapkar-1.jpg)
- माजी नगरसेवक मारुती भापकर यांचा आरोप
- चौकशीची आयुक्तांकडे केली मागणी
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात १७ व्हेंटिलेटर आणि ४० मल्टिपॅरा मॉनिटर्स खरेदीमधील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.
यासंदर्भात भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण रूग्णालयात १७ व्हेंटिलेटर्स आणि ४० मल्टिपॅरा मॉनिटर्स बसविण्याचा ठेका कोल्हापुर येथील मे. युका डायग्नोस्टीक्स या ठेकेदाराला देण्यात आला आहे. व्हेंटीलेटर्स टेक मी. टी. एस. या कंपनीचे आणि युएस एफडीए प्रमाणित असने आवश्यक असल्याची अट निविदेत होती. मात्र, “युका डायग्नोस्टिक्स” यांनी पुरविलेले व्हेंटिलेटरचे मॉडेल युएस एफडीएच्या वेबसाईटवर प्रमाणित असलेले नाही. महापालिकेची फसवणुक करण्यासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाचे व्हेंटीलेटर्स महापालिकेला पुरविण्यात आले असून यात महापालिकेची कोट्यवधी रूपयांची फसवणुक झाली आहे, असे भापकर यांनी म्हटले आहे.
पुरविण्यात आलेल्या मशिन्स योग्य कंपनीच्या असल्याचे भासविण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या नावाचे स्टिकर्स लावुन व्हेंटीलेटर्स योग्य कंपनीचे असल्याचे भासविले आहे. ही उपकरणे ताब्यात घेणाऱ्या वायसीएमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर उचित कारवाई व्हावी. एका व्हेंटीलेटर्सची किंमत १५ लाख ५० हजार असुन एकुण खरेदी १७ व्हेंटीलेटरची किंमत २ कोटी ६३ लाख ५० हजार इतकी होती. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. शिवाय हे व्हेंटीलेटर्स ठेकेदार व कंपनीच्या अधिकृत इंजिनियर्सनी बसविणे आवश्यक होते. तशी अट निविदेत आहे. मात्र, व्हेंटीलेटर्स कंपनीच्या इंजिनियर्सनी येउन बसविलेले नाहित. त्यामुळे भविष्यात वॉरंटीचा मुद्दा उपस्थित होणार आहे.
मे. युका डायग्नोस्टिक्स या कंपनीने यापुर्वी यशवंतराव चव्हाण रूग्णालयात ४० मल्टीपॅरा मॉनिटर्स ४० ते ५० दिवसांपुर्वी पुरविले आहेत मात्र त्यापैकी सुमारे ३ ते ५ मल्टिपॅरा मॉनिटर्स आत्ताच बंद पडलेले आहेत. यामुळे त्या पुरविण्यात आलेल्या मल्टिपॅरा मॉनिटर्सच्या दर्जाबाबतही प्रश्ननिर्माण होत आहे. मल्टिपॅरा मॉनिटर्सच्या एका नगाची किंमत २ लाख ८० हजार रूपये असून एकूण किंमत कोटी १२ लाख इतकी होते ही रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली असून उपकरणाचा दर्जा पाहता या मध्येही भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप भापकर यांनी केला आहे.
वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेणार
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून शहरातील करदात्यां नागरीकांच्या जीवीताशी संबंधीत आहे. त्यामुळे आपण त्वरीत स्वत: लक्ष घालुन त्रयस्थ यंत्रणेकडुन या प्रकरणाची त्वरीत निष्पक्ष चौकशी करावी. तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले जाउ नये. तसेच यामध्ये जबाबदार अधिकारी कर्मचारी व महापालिकेचे पदाधिकाऱ्यांवर त्वरीत पोलिसात तक्रार दाखल करावी. आपण या पत्राची त्वरीत दखल घेउन कारवाई न केल्यास सध्या सुरू असलेल्या अंदाजपत्रकीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी संबंधितांकडे हे प्रकरण सोपविण्याले जाईल. वेळप्रसंगी आपल्या विरोधात न्यायालयातही दावा दाखल केला जाईल, असा इशारा भापकर यांनी दिला आहे.