Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वाढीव खर्चांच्या निविदा रद्द करा – नगरसेवक तुषार कामठे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/images-1.jpg)
– या निविदांमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान
– अधिकारी-ठेकेदारांचे आर्थिंक संगनमताने भरल्या निविदा, आयुक्तांना चाैकशीचे दिले पत्र
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये ठिकठिकाणी प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर आणि इतर कामे केले जातात. या कामांची निविदा दर महानगरपालिकेच्या संबधित विभागातील अधिका-यांमार्फत निश्चित केले जातात. त्याआधारे निविदाप्रक्रिया राबवून कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणा-या निविदाधारकाकडून काम करून घेतले जाते. परंतु, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मागील काही महिन्यांपासून अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने ज्यादा दराच्या निविदा भरल्या जातात, असा आरोप भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी केला.
याबाबत महापालिका आयुक्तांना चाैकशीसाठी पत्र देवून ही मागणी केली आहे. त्यात म्हटले की, या प्रकारांमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पर्यायाने शहरातील करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब नुकतेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थापत्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेवरून निदर्शनास आली आहे. स्थापत्य विभागामार्फत डांगे चौक व काळेवाडी फाटा येथे ग्रेडसेपरेटर बांधण्याच्या कामासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु, या कामासाठी संबधित ठेकेदाराने निविदा दरापेक्षा मोठ्या प्रमाणात ज्यादा दराने निविदा भरल्या आहेत.
ज्यादा दराने आलेल्या निविदांमुळे कोट्यवधी रुपयांचा अर्थिक भुर्दंड महानगरपालिकेला सोसावा लागणार आहे. तरी ज्यादा दराने आल्याने अशा कामांमध्ये संबधित अधिकारी व ठेकेदार संगनमंताने निविदाप्रक्रिया राबवित असल्याचा संशय येतो. तरी महानगरपालिका आयुक्त म्हणून आपण तातडीने या दोन्ही कामाच्या निविदा रद्द कराव्यात. या कामांची फेरनिविदा करून नव्याने निविदाप्रक्रिया राबवावी. त्या बरोबर ही निविदाप्रक्रिया राबविणा-या संबधित स्थापत्य विभागातील सर्व अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करावी.