वाटेगावात अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले अण्णा भाऊंना अभिवादन
- वाटेगावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याची केली घोषणा
पिंपरी, (महाईन्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या वाटेगाव येथील जन्मभूमीत जाऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या वतीने वाटेगावच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही केली.
सर्वप्रथम अमित गोरखे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊंच्या घराचे व स्मारकाचे त्यांनी दर्शन घेतले. नंतर अण्णा भाऊंच्या स्नुषा सावित्रीबाई व नातू सचिन साठे यांचा महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी वाटेगावचे सरपंच सुरेश साठे, योगेश साठे, सतीश घाडगे, अविनाश सौदाडे, चंद्रकांत काळोखे, अनिल सौंदडे, सागर गायकवाड, अविनाश कामबीकर, दीपक चखाले, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीनंतर महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, वाटेगावच्या भूमीला वंदन करून मनस्वी समाधान वाटले आणि माझ्या पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळाली. ज्या मातीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊंसारखा महापुरुष घडवला. त्या मातीतील कण न कण हा माझ्यासाठी चैतन्य देणारा आहे. अण्णाभाऊंच्या वास्तूने मला चिरंतन काळासाठी पुरेल इतकी ऊर्जा दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी वाटेगावच्या सर्वांगीण व शाश्वत विकास केला जाईल. हे करण्यासाठी ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मगाव’ विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाने ५० लाख रुपयांचा निधीची घोषणा केली आहे. तसेच, महामंडळातर्फे नवीन सुरु होणाऱ्या स्किल डेव्हलपमेंट योजनेचा शुभारंभ वाटेगाव पासून करणार आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रमाचा शुभारंभ सांगली येथून करणार असल्याचे यावेळी अमित गोरखे यांनी सांगितले.
सचिन साठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, योगेश साठे यांनी आभार मानले.