breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लॉकडाऊनमध्ये घरात बसून त्रासलेल्या मध्यप्रदेशातील अल्पवयीन मुलीने गाठले पुणे

पिंपरी |महाईन्यूज|

लॉकडाऊनमध्ये घरात बसून वैतागलेल्या मध्यप्रदेशातील एका अल्पवयीन मुलीने अचानक घर सोडले. खंडवा येथून बसने प्रवास करून थेट पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर आई-वडिलांची आठवण होऊ लागल्याने मुलगी घाबरली. एका सतर्क तरुणाने मुलीला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

सोपान किसनराव पौळ (वय २१, रा. काळाखडक, वाकड) या तरुणाने एका अल्पवयीन मुलीला रविवारी सकाळी अकराच्या सुमारास वाकड पोलीस ठाण्यात आणले. ती मुलगी हरवली असून तिला तिच्या आई-वडिलांकडे जायचे असल्याचे सोपान पाैळ याने पोलिसांना सांगितले. मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. मला आई-वडिलांकडे सोडा, असे म्हणत ती रडत होती. पोलिसांनी तिला शांत केले आणि विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली. ती मध्य प्रदेशमधील खंडवा येथील असल्याचे तिने सांगितले.

लॉकडाऊनमध्ये घरातच थांबवे लागले होते, त्यामुळे घरात बसून वैताग आला होता. म्हणून घरामध्ये कोणास काही न सांगता फिरण्यासाठी घरामधून पाच हजार रुपये गुपचुप घेऊन एकटीच २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातला निघाली. तेथून बसने पुण्याला आली. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाला पुण्यात उतरले, असे मुलीने सांगितले.

पोलिसांनी तिच्याकडून तिच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क केला. दरम्यान मुलीचे आई, वडील आणि भाऊ खंडवा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्याचे समोर आले. वाकड पोलिसांनी खंडवा पोलिसांशी संपर्क साधला. मुलगी सुखरूप असल्याचे त्यांना सांगितले. मुलीच्या आईवडिलांनी त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना वाकड पोलीस ठाण्यात पाठवले. पुण्यातील नातेवाईकांची ओळख पटवून वाकड पोलिसांनी मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान मुलीने एक मोबाईल फोन घेतला होता. मोबाईल दुकानदाराची माहिती काढून मोबाईल परत करून मुलीला तिचे पैसेही पोलिसांनी परत मिळवून दिले.

वाकड पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक विकास मडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांनी पथकाचे कौतुक केले. अल्पवयीन मुलीचे वडील व भाऊ यांनी पिंपरी – चिंचवड पोलिसांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button