breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रेल्वेच्या क्लॉक रुममध्ये चोरीचे अमेरिकरन डॉलर : चालबाज चोर अटकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CHORI-LOCK.jpg)
घरात ठेवलेले अमेरिकन डॉलर आणि युरो करन्सी, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांची चोरी करणा-याला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने चोरीचे सामान पुणे रेल्वेच्या कॉल्क रूममध्ये ठेवल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार कॉल्क रूममधून चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यात आला.
बुद्धदेव बिष्णू बिश्वास (वय 20, रा. साने चौक, चिखली. मूळ रा. बिद्यासागरपल्ली, ता. कोकेबेन, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. या प्रकरणी संदीपराव पाटील (वय 36, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने पाटील यांच्या घराच्या दरवाजाची कडी खिडकीतून हात घालून उघडली. घरात ठेवलेले 2100 अमेरिकन डॉलर आणि 250 युरो आदी विदेशी चलन तसेच दोन अॅपल आयपॅड, एक लॅपटॉप, डेबिट व क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, आंतरराष्ट्रीय ड्राइविंग लायसन्स, युरोपियन हेल्थ कार्ड, घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.
निगडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला आज (रविवार, दि. 13) सकाळी सात वाजता चोरीला गेलेल्या मोबाईलचे लोकेशन मिळाले. चोरीला गेलेला मोबाईल पुणे रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याच्या खिशात रेल्वे कॉल्क रूमची पावती मिळाली. कॉल्क रूममधील सामान तपासले असता पाटील यांच्या घरात झालेल्या चोरीतील लॅपटॉप, अमेरिकन करन्सी, युरो करन्सी, डेबिट व क्रेडिट कार्ड, मोबाईल, आयपॉड, आयपॅड, पॅनकार्ड, आंतरराष्ट्रीय ड्राइविंग लायसन्स, युरोपियन हेल्थ कार्ड आणि अन्य कागदपत्रे असे एकूण 3 लाख 58 हजार 656 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.